प्रीतिसंगमावरील गैरसोयींबाबत मनसे आक्रमक

By Admin | Updated: August 9, 2015 21:05 IST2015-08-09T21:05:12+5:302015-08-09T21:05:12+5:30

आंदोलनाचा इशारा : तीन कोटीच्या निधीतून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

MNS aggressive about the inconvenience of the conversation | प्रीतिसंगमावरील गैरसोयींबाबत मनसे आक्रमक

प्रीतिसंगमावरील गैरसोयींबाबत मनसे आक्रमक

कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम परिसर सध्या गैरसोयींच्या विळख्यात सापडला आहे. प्रीतिसंगमाला अनेक पर्यटक, अभ्यासक तसेच भाविक भेटी देत असताना याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, तीन कोटींचा निधी उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या निधीचा वापर करून तातडीने येथे सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांना निवेदन दिले असून, योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कऱ्हाडात अनेक वास्तू आहेत ज्या वास्तूंना पर्यटक व भाविक भेट देत असतात. मात्र, त्या वास्तूंच्या देखभाल, सुशोभीकरण व दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. प्रीतिसंगम परिसरही भाविक व अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, या परिसरात नेहमीच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसते. येथे स्वच्छतागृह नाहीत. वीज दिव्यांची सोय नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेलेले नाहीत. प्रेमीयुगुलांबाबत कोणतीही उपाययोजना होत नाही. तसेच मद्यपी व धूमस्टाईलने दुचाकी चालविणाऱ्यांवरही कारवाई केली जात नाही.
येथे पार्किंगचा अभाव आहे. वाहने घाट रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे पार्क केलेली दिसतात. या सर्व बाबींकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रीतिसंगम परिसरासाठी तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, आजअखेर या निधीचा वापर करण्यात आलेला नाही. या निधीचा तातडीने वापर करून येथे सोयीसुविधा उभाराव्यात. ते करीत असताना प्रामुख्याने येथील गैरसोयींचा विचार करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पोलीस चौकीची गरज
प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपटावरील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पकृती उभारावी, स्वागत कमान उभी करावी, प्रीतिसंगमाची माहिती देणारा फलक उभारावा व येथे स्वतंत्र पोलीस चौकीची उभारणी करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: MNS aggressive about the inconvenience of the conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.