आमदार आदर्श गावाला मिळतंय बारा दिवसांनी पाणी
By Admin | Updated: April 2, 2017 16:36 IST2017-04-02T16:36:33+5:302017-04-02T16:36:33+5:30
देऊरकर हैराण : ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे अनेकांची पाण्यासाठी वणवण

आमदार आदर्श गावाला मिळतंय बारा दिवसांनी पाणी
आॅनलाईन लोकमत
वाठार स्टेशन , दि. २ : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील आमदार आदर्श देऊर गाव सध्या पाणी टंचाईने हैराण झाले आहे. या गावाला ग्रामपंचायतीच्या गलथानपणामुळे आठवड्यातून केवळ तासभर पाणी मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कोरेगावच्या आमदारांनी या गावाला दत्तक घेण्याचा निर्णय घेत गाव विकासाचा आदर्श आराखडा बनवला. मात्र, या आराखड्यातला विकास कागदावर आणि बैठकीपुरताच मर्यादित राहिला आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे जाहीर झालेल्या आमदार आदर्श गाव योजनेला आज जवळपास दोन वर्षांचा काळ लोटला. या गावाला शासन विषेश सहकार्य करणार असल्याने ज्या गावांची या योजनेत निवड झाली त्या गावांनी सुरुवातीलाच दिवाळी साजरी केली. कोरेगाव विधानसभा मतदार संघातील देऊर हे मोठ्या लोकसंख्येचा गाव आमदार शशिकांत शिंदे यांनी दत्तक घेत या गावाच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीच्या काळात गावच्या विकासासाठी आराखडा बनवला. रस्ते, पाणी या बरोबर गावचा सर्वांगीण विकास कसा होणार, या बद्दल जनजागृती झाली. त्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांच्याही बैठका झाल्या. या अधिकाऱ्यांनीही अधिकाधिक निधी या गावाला देण्याबाबत प्रयत्न केला.
आमदार आदर्श गाव दत्तक घेतल्यानंतर या गावची पंचवार्षिक निवडणूकही गावाने बिनविरोध करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, या निवडणुकीनंतर गावाला दिशादायी नेतृत्वच उरलं नसल्याने आज अनेक समस्यांनी गावकरी हैराण आहेत. एकाच पक्षात अनेक गटतटामुळे गावचा विकास आज ही ठप्प आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावासाठी कोणतीही शास्वत अशी पाणी योजना आजही अस्तित्वात नाही. तर असणाऱ्या पाणी योजनेतून सुटलेलं पाणी ग्रामस्थांना कोणत्या परस्थितीतून मिळवावं लागतंय ही वेगळीच समस्या ग्रामस्थ अनुभवत आहेत.
ग्रामस्थांमधून संताप व्यक्त
एका बाजूने ग्रामपंचायतीच्या करवसुलीसाठी स्पिकर लावून ग्रामस्थांना कोर्टात पाठवण्याची भूमिका घेणाऱ्या ग्रामपंचायतीने आज गावाला पाणी देण्याबाबत मात्र उदासीन भूमिका घेतल्याने ग्रामस्थातून मात्र संताप व्यक्त होत आहे. उपलब्ध पाणी नियोजनाच्या अभावामुळे अनेकांना मिळत नाही.
पाणी समस्येची पाहणी करावी...
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठे हाल सोसावे लागत आहे. या पाणी समस्येची एकदा कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, अशी मागणी ही देऊर ग्रामस्थ करत आहेत. आमदार आदर्श गावची सर्वात आवश्यक असणारी पाणी समस्या सोडविण्याबाबत तत्काळ आमदारांनी बैठक आयोजित करून या गावाचा किमान पाणीप्रश्न तरी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.