कारागृह साताऱ्याबाहेर हलविण्यासाठी आमदार आक्रमक

By Admin | Updated: July 15, 2015 00:20 IST2015-07-14T22:03:13+5:302015-07-15T00:20:38+5:30

शिवेंद्रसिंहराजे : सर्व आमदार अधिवेशनात आवाज उठविणार

MLA aggressor to move out of jail premises | कारागृह साताऱ्याबाहेर हलविण्यासाठी आमदार आक्रमक

कारागृह साताऱ्याबाहेर हलविण्यासाठी आमदार आक्रमक

सागर गुजर - सातारा -शहरात असणारे कारागृह शहराबाहेर नेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व आमदार आक्रमकपणे पावसाळी अधिवेशनात मागणी करणार आहेत. पुनर्वसनांच्या प्रश्नाबाबतही तातडीने निर्णय व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सातारा शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या जिल्हा कारागृहाच्या आजूबाजूच्या परिसरात बांधकाम करण्यावर बंधने घातली गेली आहे. ५00 मीटरच्या आत बांधकाम करणे कठीण होऊन बसले आहे. आजूबाजूची घरे पडायला झाली तरी बांधकाम करता येत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष आहे.
परिसरातील नागरिकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रश्न समजावून घेतला. तसेच नागरिकांच्या हितासाठी विधीमंडळात हा विषय लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांवर होत असलेल्या या अन्यायाबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदारही याबाबत आक्रमक झाले आहेत. कारागृहामध्ये गंभीर गुन्हे केलेले कैदी असतात. काही वर्षांपूर्वी कारागृहाच्या भींतीवरुन उडी मारुन कैदी पसार झाला होता. साहजिकच या कैद्यांपासून आजूबाजूच्या वस्तीला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे हे कारागृह शहराबाहेर नेणेच योग्य ठरणार आहे.
बांधकामांवर बंधने न घालता हे कारागृह शहराबाहेर न्यावे, अशी आमदारांची मागणी आहे. काही दिवसांत हद्दवाढीचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता असल्याने सोईस्कर जागा पाहून हे कारागृह बाहेर नेण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील महू-हातगेघर, उरमोडी येथील पुनर्वसनाचा प्रश्नही गंभीर असून तो तातडीने सोडवून पुनर्वसितांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे प्रश्न मांडणार आहे, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

मेडिकल कॉलेज झालेच पाहिजे
साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाचे नेमके काय झाले?, याचा जाबही विचारला जाणार आहे.

मुंबईतील आॅर्थर रोड जेल लोकवस्तीत असतानाही त्याच्याभोवतीने मोठी बांधकामे झाली आहे, मग साताऱ्यात का होऊ शकत नाही. हाच मुद्दा आम्ही उपस्थित करणार आहोत.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
आमदार

Web Title: MLA aggressor to move out of jail premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.