मायणीत दुष्काळात तेरावा..!
By Admin | Updated: May 27, 2014 01:23 IST2014-05-27T01:07:14+5:302014-05-27T01:23:31+5:30
जलवाहिनीला गळती : हजारो लिटर पाणी वाया

मायणीत दुष्काळात तेरावा..!
मायणी : येथील मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टंचाई काळातच अगोदर येथील नागरिक पाणी-पाणी करीत आहेत. त्यातच या गळतीमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आलेली आहे. यामुळे नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. ही गळती लवकर काढण्याची मागणी होत आहे. येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. असे असूनही येथील नागरिकांना १० ते १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकांनी राजकीय, सामाजिक व व्यक्तिगत ताकद वापरुन व कर्मचार्यांना हाताशी धरून परस्पर मुख्य जलवाहिनीतून कनेक्शन घेतली असल्याचा आरोप सामान्य नागरिकांतून होत आहे. त्यामुळे टंचाईच्या काळातही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक पाण्यात डुंबत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत असल्याची परिस्थिती आहे. खासगी मालकीच्या विंधन विहिरींचा आश्रय घ्यावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न सोडविण्याचा गेली अनेकवर्षे प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही सर्वांना समान पाणी वाटप होताना दिसून येत नाही. गावाच्या आसपास नव्याने वसलेली उपनगरे, वाड्या-वस्त्यांनाही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यासाठी प्रत्येकवर्षी टँकरची माणगी करावी लागते. यंदाही उपनगरांसाठी ग्र्रामपंचायतीने टँकरची मागणी केली आहे. मात्र, तालुका प्रशासनाने अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईने लोक हैराण होऊ लागले आहेत. मायणीत तीव्र पाणीटंचाई असतानाच गावातील मुख्य रस्त्याने गेलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागलेली आहे. कर्मचार्यांना पाण्याचे महत्व वाटत नसल्याने गळती काढण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. सध्या या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही अन् रस्त्याने पाणी वाहत असल्याचे पाहून लोकांतून तीव्र प्रतिक्रीय उमटत आहेत. (वार्ताहर)