सातारा : साताऱ्यातील पाणी बारामती, सांगलीला गेले. पण, सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरपासून पूर्व भागातील ६५ किलोमीटरच्या दुष्काळीमाणमध्ये गेले नाही. दरवर्षी एक किलोमीटरचे काम झाले असते तर पाणी पोहोचले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ते आले. पण, २० वर्षे मंत्री राहूनही दुष्काळ गेला नाही. त्यांचं कालचक्र सुरू झालं आहे, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंना नाव न घेता लगावला. दरम्यान, कार्यशाळेत नेत्यांनी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार बोलून दाखवला.साताऱ्यातील एका हाॅटेलमध्ये भाजपची पक्ष नोंदणी अभियानांतर्गत कार्यशाळा झाली. यावेळी मंत्री गोरे बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अॅड. भरत पाटील, सुनील काटकर, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, अविनाश कदम, चिन्मय कुलकर्णी आदी उपस्थित होते.मंत्री गोरे म्हणाले, भाजपकडे कधीही मंत्रीपद मागायला गेलो नव्हतो. तरीही पक्षाने सर्वसामान्य घरातील पोराला मंत्री केलं. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. कारण, दुसऱ्या पक्षानं जिल्हाध्यक्षही केलं नव्हतं. आता पक्षनोंदणी करुन अधिकाधिक सभासद करायचे आहेत. पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांची निवडणूक आहे. आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाऊ. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली पाहिजे. सत्ता असताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला नाही. आता तर सत्ता असल्याने चिंता करु नका. कार्यकर्त्यांचा सन्मान राखना जाईल तसेच गावात काम करताना अडचण येणार नाही हेही पाहिले जाईल.मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार खोलवर रुजले असे म्हटले जात होते. पण, आताच्या निवडणुकीत सर्वांनी काम केल्याने बदल घडला हे आपण राज्याला दाखवून दिले आहे. आता पक्ष सदस्य नोंदणीचे अभियान यशस्वीपणे पार पाडायचे आहे. कारण, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची निवडणूक होत आहे. या सर्व संस्था भाजपच्या ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. स्थानिक स्वराज संस्था जिंकायचीच याची खुणगाठ बांधा. पुढील १५ ते २० वर्षे विरोधक उभे राहतील असे वाटत नाही. तरीही आपण गाफील राहू नये. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विठ्ठल बलशेटवार यांनीही मार्गदर्शन केले.
Satara: माणमधील दुष्काळावरुन मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजेंना टोला, म्हणाले..
By नितीन काळेल | Updated: December 25, 2024 18:44 IST