अधिकाऱ्यांना मिनरल; लोकांना दूषित पाणी
By Admin | Updated: March 11, 2016 23:58 IST2016-03-11T22:26:51+5:302016-03-11T23:58:35+5:30
पाटण तालुका : शंभर गावे टंचाई घोषित, पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखा; सदस्यांचे आवाहन--पंचायत समिती मासिक सभा

अधिकाऱ्यांना मिनरल; लोकांना दूषित पाणी
पाटण : तालुक्यातील शंभर गावे पाणीटंचाई म्हणून घोषित झाली असताना आणि त्यापैकी सहा गावांना टँकरने पाणी पुरवायची वेळ आली असताना अधिकारी नियमांवरच बोट ठेवून उपाययोजना करण्यास विलंब करत असतील आणि दुसरीकडे घोट (फडतरवाडी) येथील लोक पाणीटंचाईमुळे विहिरीतील जलयुक्त दूषित पाणी पित असतील तर मिनरलचे पाणी पिणाऱ्या अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत सर्वच सदस्यांनी पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखा, असा इशारा दिला.
सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची सभा पार पडली. प्रारंभी सदस्य नथुराम कुंभार यांनी तालुक्यात पाणीटंचाईची भयानक स्थिती असल्याचे सांगितले. त्यावर राजाभाऊ शेलार यांनी पावसाळा येईल, महिन्यापासून एकही टँकर तालुक्यात पाण्यासाठी आलेला नाही. अधिकारी यापुढे डोळ्यांत तेल घालून काम करतील? असा सवाल केला. तर सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी आक्रमक होत घोट (फडतरवाडी) गावास भीषण पाणीटंचाई भासत असून, विहिरीतील दूषित पाणी
लोक पितात. हेच पाणी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना
पाजले पाहिजे, असे त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
वीजवितरण अधिकाऱ्यावर ताशेरे
सहायक अभियंता जे. व्ही. पाटील गेल्या बैठकीत म्हणाले होते की, ‘मी काय जेवण, अंघोळ करत असताना मोबाईल कॉल उचलायचा का?’ यावर शोभा कदम यांनी पाटील यांना धारेवर धरत काखट गावात डीपी जळून वीजपुरवठा बंद झाला आहे. वीज कर्मचाऱ्यांना फोन केला तरी गावात गेले नाहीत. मग तुम्हाला नेमका कधी फोन करायचे ते सांगा?,’ असा सवाल उपस्थित केला.
‘कोयना धरणाच्या पाणी साठ्याच्या आत वाजेगावची घरे आहेत. तेथे प्राथमिक शाळा आहे. त्यांना कोयनानगर येथे ये-जा करण्यासाठी लाँच सुरू करा; अन्यथा आंदोलन करू,’ अशी मागणी राजाभाऊ शेलार यांनी केली.
अधिकाऱ्यांना उचलून आणू..
सभेच्या प्रारंभीच अधिकारी बैठकीस गैरहजर असल्याचे सदस्यांना निदर्शनास आले. यामध्ये कृषी, आरोग्य, एसटी, वनविभाग सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. याबाबत उपसभापती डी. आर. पाटील म्हणाले, ‘पुढच्या बैठकीस अधिकारी नसतील तर खपवून घेणार नाही.’ रामभाऊ लाहोटी म्हणाले,‘अधिकाऱ्यांना गाड्या पाठवून सभेस आणले जाईल.’ शेलार म्हणाले, सभेला गैरहजर राहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना उचलून आणावे लागेल.