वाळूचे कोट्यवधींचे घबाड जप्त
By Admin | Updated: June 10, 2016 00:16 IST2016-06-09T23:49:43+5:302016-06-10T00:16:52+5:30
वडोलीत ठिय्यावर कारवाई : सत्तर ट्रकसह पोकलॅन, बोटी ताब्यात; ५२ वाफे उद्ध्वस्त

वाळूचे कोट्यवधींचे घबाड जप्त
कऱ्हाड : वडोली भिकेश्वर-धनकवडी (ता. कऱ्हाड) येथील बेकायदा वाळू ठेक्यावर महसूल विभागाने गुरुवारी छापा टाकला. यावेळी वाळू उपसा करणारी कोट्यवधींची यंत्रसामग्री महसूलच्या हाताला लागली असून, वाळूने भरलेले व रिकामे असे सुमारे ७० ट्रकही जप्त करण्यात आले आहेत. यावेळी वाळूचे ५२ वाफेही उद्ध्वस्त करण्यात आले. कृष्णा नदीपात्रात अडकलेल्या ३२ बोटी बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कऱ्हाड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती यापूर्वी तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी कारवाईही करण्यात आली. त्यावेळी सुमारे ४२ वाफे बंद करण्यात आले होते. त्यानंतर वडोली भिकेश्वरमधील वाळू उपसा थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महिन्यांतच येथे ठेकेदारांनी डोके वर काढले. पुन्हा एकदा याठिकाणी बेकायदा वाळू उपसा होऊ लागला. ही माहिती मिळताच गुरुवारी सकाळी महसूल विभागाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, नायब तहसीलदार अरुण कदम, यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचताच नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारांनी व कामगारांनी पात्रातून धूम ठोकली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यास एकही ठेकेदार व कामगार थांबला नाही. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, नायब तहसीलदार अरुण निकम, सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी पोलिस बंदोबस्तात कारवाईस सुरुवात केली. वडोली भिकेश्वर येथील सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरावर गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. जिल्ह्णातील बड्या वाळू ठेकेदारांनी कब्जेपट्टी घेतली नसताना अनेक महिन्यांपासून राजरोसपणे मोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर करत वाळू उपसण्यास सुरुवात केली होती.
वाळू वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी झाडे ठेकेदारांनी बेकायदेशीररीत्या तोडली असल्याचे कारवाईवेळी निदर्शनास आले. तसेच पोकलॅन, जेसीबी, यांत्रिक बोटी, ट्रक, डंपर यासह इतर साहित्य पाहून अधिकाऱ्यांनाही धडकी भरली. या अनधिकृत ठिय्याची व्याप्ती मोठी असल्याने कारवाईस सुमारे दोन दिवस लागतील, असे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सांगितले.
कोट्यवधींचा माल हस्तगत
वडोली भिकेश्वर येथील संबंधित वाळू ठेक्यावरून महसूल विभागाने वाळूने भरलेले २९ ट्रक, रिकामे ४० ट्रक, ५ पोकलॅन मशीन जप्त केल्या आहेत. तसेच वाळू उपशासाठी ठेकेदारांनी ३२ बोटींचा वापर केला आहे.
त्यापैकी फक्त पाच बोटी रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्यात यश आले होते. इतर बोटी आज, शुक्रवारी बाहेर काढल्या जाणार आहेत. एकूण ५२ वाफे या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले असून, कोट्यवधींचा माल हस्तगत केला आहे.