कोटीचे बक्षीस लागल्याचे भासवून लाखोंचा गंडा
By Admin | Updated: September 20, 2014 00:37 IST2014-09-19T22:31:24+5:302014-09-20T00:37:18+5:30
दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोटीचे बक्षीस लागल्याचे भासवून लाखोंचा गंडा
सातारा : ‘एका नामांकित शीतपेयाच्या कंपनीतून बोलतोय,’ असे सांगून एक कोटी ६० लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एका युवकाला तब्बल दीड लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
महेंद्र कुलकर्णी (वय १७, रा. शनिवार पेठ सातारा) याच्या मोबाईलवर काही दिवसांपूर्वी एक फोन आला. ‘राजू आणि हरीषकुमार बोलतोय,’ असे सांगून बक्षिसाचे पैसे हवे असतील तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील, हे ऐकून कुलकर्णी तयार झाला. संबंधित व्यक्तींनी विविध बॅँकांचे खातेनंबर कुलकर्णीला दिले. कुलकर्णीने सुरुवातीला १४ हजार, त्यानंतर ५० हजार, ४६ हजार पुन्हा ४६ हजार असे चार टप्प्यांत एक लाख ५७ हजार रुपये भरले. तरीही संबंधित व्यक्तींनी आणखी काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले. एवढे पैसे भरूनही बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याने कुलकर्णीला शंका आली. त्यानंतर त्याने हा प्रकार त्याच्या आईला सांगितला.आईने शहर पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेबाबत हकीगत सांगितली. पोलिसांनी राजू आणि हरीषकुमार या नावाच्या व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)