लाखोंची अवैध दारु जप्त
By Admin | Updated: February 3, 2015 23:59 IST2015-02-03T23:23:38+5:302015-02-03T23:59:58+5:30
एकास अटक : सहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लाखोंची अवैध दारु जप्त
सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी बेकायदा दारु वाहतूक आणि विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून यापैकी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत टेम्पो आणि देशी दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक बापूराव जंगम यास अटक करण्यात आली आहे तर ज्याच्यासाठी जंगम दारु घेऊन निघाला होता, त्या मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. बापूराव शिवलिंग जंगम सातारा ते भाटमरळी मार्गावर चारचाकीतून विनापरवाना दारूची चोरटी विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर आणि सहकाऱ्यांनी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीनजीक सापळा लावला. यानंतर काही वेळातच साताऱ्याकडून खिंडवाडी बाजूकडे टाटा एसीई (एमएच ११ - बीएल ३२२१) येताना दिसली. खिंंडवाडी येथे गतीरोधकावर संबंधित चारचाकीचा वेग कमी झाल्यामुळे पोलीस नाईक कांतीलाल नवघणे आणि रामा गुरव यांनी चालकास गाडी बाजूला घेण्यास सांगितले. गाडीचालकास त्याचे नाव विचारले असता त्याने बापूराव शिवलिंग जंगम (वय ३३, व्यवसाय-चालक, रा. भाटमरळी, ता. सातारा) असे सांगितले. गाडीच्या हौद्यात काय आहे असे विचारले असता त्याने देशी दारुचे सत्तर बॉक्स असल्याचे सांगितले. दारु विकण्याचा अथवा पिण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली तर त्याने नसल्याचे सांगितले. दरम्यान, हे देशी दारुचे बॉक्स एच. के. भोसले यांच्या गोदामातून घेतले असून त्याची पावतीही आहे. हे बॉक्स भाटमरळी येथे संजय वसंत पाटील यांना देण्यासाठी निघालो असल्याचे जंगम याने सांगितले. स्थानिक गुन्हे शाखा कर्मचाऱ्यांनी त्याच्या जवळ असणाऱ्या पावतीची पाहणी केली असता त्यावर ‘विशाल वाईन्स, सातारा’ असे लिहल्याचे आढळून आले. यानतंर पोलिसांनी जंगम याच्याकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परिणामी तो देशी दारुची चोरटी वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेने जंगम याच्यावर गुन्हा दाखल करत तत्काळ अटक केली. याचबरोबर संजय पाटील याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर, शामराव मदने, सहायक पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, हवालदार संजय पवार, दीपक मोरे, विजय शिर्के, संजय शिंदे, पोलीस नाईक कांतीलाल नवघणे, रामा गुरव, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन शेळके, नितीन भोसले, राहुल कणसे, महेश शिंदे, चालक संजय जाधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अपशिंगेमध्येही पकडली दारू
अवैध दारु वाहतूक आणि विक्रीप्रकरणी बोरगाव पोलिसांनी अपशिंगे येथील एकास अटक केली असून त्याच्याकडून सहा हजार रुपये किमतीचे चार दारुचे बॉक्स जप्त केले आहेत. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, हरिदास रामचंद्र राठोड (रा. अपशिंगे, ता. सातारा) हा आपल्या दुचाकीवर दारुचे चार बॉक्स घेऊन देशमुखनगरहून अपशिंगेकडे निघाला होता. ही माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून हरिदास राठोड यास अटक केली आहे. पोलीस नाईक भगवान इंगूळकर तपास करत आहेत.