‘व्हिजन सातारा’ रोखणार स्थानिक युवकांचे स्थलांतर
By Admin | Updated: May 21, 2015 00:12 IST2015-05-19T22:58:28+5:302015-05-21T00:12:15+5:30
‘व्हिजन सातारा’साठी क्रिडाई, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, सातारा, बिल्डर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा शाखा, तसेच मेडिया, आयआयआयडी, आयआयए अशा विविध संस्था एकत्रित

‘व्हिजन सातारा’ रोखणार स्थानिक युवकांचे स्थलांतर
सातारा : जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सुविधा निर्माण झाली आहे. मात्र, सुशिक्षित युवकांना नोकरीसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर रोखण्यासाठी तसेच शहर व सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ‘व्हिजन सातारा’च्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न होणार आहेत, अशी माहिती ‘व्हीजन सातारा’चे समन्वयक कमलेश पिसाळ यांनी दिली.
‘व्हिजन सातारा’साठी क्रिडाई, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, सातारा, बिल्डर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा शाखा, तसेच मेडिया, आयआयआयडी, आयआयए अशा विविध संस्था एकत्रित आल्या आहेत. मेकिंग आॅफ सातारा या विषयावर नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, निवृत्त आयकर आयुक्त अरुण पवार, टाटा सिक्युरिटजचे वरिष्ठ संचालक, अकोल्याचे नूतन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयटी तज्ज्ञ हेमंत जोशी, जाल कूपर, कर्तव्य सोशल ग्रुपच्या वेदांतिकाराजे भोसले, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘व्हीजन सातारा २०२०’ लोगोचे उद्घाटन करण्यात आले.
‘व्हिजन सातारा’च्या माध्यमातून प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून योगदान दिले तर शासन व प्रशासनाच्या मदतीशिवाय जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. उद्योगधंदे वाढले तर स्थलांतर थांबेल, यासाठी प्रयत्न होणार आहेत, असे पिसाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चार गोष्टींवर लक्ष केंद्रित
खंबाटकी बोगद्याचे काम झाल्यास जिल्ह्यात नवीन उद्योग येतील. बीव्हीजीच्या माध्यमातून सुमारे ११० एकर क्षेत्रावर फूड पार्क उभे राहणार असून यामुळे दहा ते पंधरा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सातारा हद्दवाढ, मेडिकल कॉलेज, महिला रुग्णालय यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ‘व्हिजन सातारा’ यशस्वी करण्यासाठी चार गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे पिसाळ यांनी सांगितले.