म्हसवडला शाही मिरवणुकीने महोत्सव सांगता
By Admin | Updated: April 23, 2015 00:56 IST2015-04-22T21:40:38+5:302015-04-23T00:56:58+5:30
शिवजयंती : चार दिवस कार्यक्रम; नाटक, नृत्य, झांज पथकांचा सहभाग

म्हसवडला शाही मिरवणुकीने महोत्सव सांगता
म्हसवड : येथील शिवजयंती उत्सव समिती व स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती महोत्सवाची सांगता शाही मिरवणुकीने करण्यात आली.संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण ठरलेल्या येथील शिवजयंती महोत्सव यंदाही नाटक, कलापथके, पारंपरिक नृत्य पथक, मल्ल खांब, झांज पथक आदी कार्यक्रमांनी झाला. सलग चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश रसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येते. यंदाही १७ एप्रिल रोजी जयंती महोत्सवास शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने येथील महात्मा फुले चौकात उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपामध्ये छ. शिवाजी महाराजांच्या ११ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना पारंपरिक पद्धतीने मेघडंबरीत करण्यात आली होती. छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख मदन कदम, नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, सिनेअभिनेते भरत जाधव, जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती शिवाजीराव शिंदे, नगरसेवक नितीन दोशी, मारुती वीरकर, धनाजी माने, तेजसिंह राजेमाने, अण्णासाहेब कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर रात्री ‘श्रीमंत दामोदर पंथ’ हे तुफान विनोदी नाटक सादर करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी शिवशाहीर देवानंद माळी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी पुणे येथील कीर्तनकार रोहिणी माने परांजपे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांना म्हसवड परिसरातील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी मुख्य आकर्षण असणाऱ्या शाही मिरवणुकीस शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, नवी मुंबईचे उपशहर प्रमुख शंकर वीरकर, रणजितसिंह भोसले, चंद्रकांत जाधव, प्रमोद काकडे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन रुढ पुतळ्याची मेघडंबरीच्या रथातून शाही मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)
नागठाणेतील मिरवणुकीत युवकांचा सहभाग
नागठाणे : सातारा तालुक्यातील नागठाणे येथे प्रथमच शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हलगीच्या ठेक्यावर ताल धरलेली शाळकरी मुले, पारंपरिक संबळ वाद्य, झांजपथक आणि भगवे फेटे परिधान केलेले युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शिवस्वराज्य प्रतिष्ठानने आयोजित केलेली शाही मिरवणूक अधिक आकर्षित ठरली.
शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी तोरणा किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योतीचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. गावातील अजिंक्य व्यासपीठ येथे ही शिवज्योत ठेवण्यात आली होती. सायंकाळच्या सुमारास येथूनच मिरवणूक सुरू झाली. सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये छ. शिवाजी महाराज यांची सिंहासनारुढ मूर्ती ठेवण्यात आली होती. या शाही मिरवणुकीत शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते. त्यामुळे मिरवणुकीत भगवे वातावरण तयार झाले होते.
साखरवाडीत ‘जय भवानी,
जय शिवाजी’चा जय घोष
साखरवाडी : शिवजयंतीनिमित्त साखरवाडीसह परिसरातील गावागावातून विविध मंडळांनी आणलेल्या शिवज्योतींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत ढोल,ताशांचा गजर होता. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. साखरवाडीसह सुरवडी व परिसरामध्ये तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साखरवाडी येथे शाही मिरवणुकीमध्ये घोड्यांवर स्वार असलेले व विविध वेशभूषा केलेले युवक लोकांचे आकर्षण ठरले होते. साखरवाडी परिसरातील अनेक नवतरुण मंडळांनी एकत्र येऊन शिवनेरीवरून शिवज्योत आणली होती. या ज्योतीचे स्वागत न्यू फलटण शुगर वर्क्सचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे-पाटील, महानंदचे संचालक डी. के. पवार, सरपंच सुरेश भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.