म्हसवड पालिकेकडून कोरोनाग्रस्त अन् निराधारांचे उदरभरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:53+5:302021-05-21T04:41:53+5:30
म्हसवड : म्हसवड पालिकेकडून कोरोना पीडित रुग्ण, त्यांचे नातेवाईक व निराधार व्यक्तींना दोन वेळेच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात ...

म्हसवड पालिकेकडून कोरोनाग्रस्त अन् निराधारांचे उदरभरण
म्हसवड : म्हसवड पालिकेकडून कोरोना पीडित रुग्ण, त्यांचे नातेवाईक व निराधार व्यक्तींना दोन वेळेच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली. कोरोनासारख्या भीषण संकटात पालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना सततच्या संचारबंदीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे गावात फिरणारे भिकारी, गतिमंद व्यक्तींना जेवण मिळण्याची भ्रांत पडली होती. अशा निराधार व्यक्तींसह कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना जेवण उपलब्ध करण्यासाठी म्हसवड नगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पालिका मुख्याधिकारी, सर्व सदस्य आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
म्हसवड व परिसरात असलेले खासगी कोविड रुग्णालय, म्हसवड कोविड सेंटर, जनसेवा कोविड कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेले कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाइकांना पालिकेकडून दोन वेळचे जेवण उपलब्ध केले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ म्हसवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
(कोट)
म्हसवडमधील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सततच्या संचारबंदीमुळे मोठी आर्थिक झळ बसली आहे. तसेच गावातून फिरणारे मनोरोगी, वेडसर, अनाथ लोकांचीदेखील अनेक दिवसांपासून उपासमार सुरू आहे. अशा व्यक्तींना पालिकेच्या माध्यमातून दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी