पुरूषांना नोकरीची तर महिलांना संसर्गाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:14+5:302021-05-11T04:41:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या अनेक पुरूषांच्या नोकऱ्यांवर कोरोना काळात गदा आली तर काहींना पगार कपातीच्या ...

पुरूषांना नोकरीची तर महिलांना संसर्गाची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या अनेक पुरूषांच्या नोकऱ्यांवर कोरोना काळात गदा आली तर काहींना पगार कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे घरातील उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवायचा कसा, हा प्रश्न पुरूषांच्या डोक्यात आहे. तर घराबाहेर पडणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली तर पुढं कसं करणार, ही चिंता महिलांना सतावत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यवसायात केलेली गुंतवणूक आणि त्यासाठी उभं केलेल्या कर्जाचा डोंगर पेलणं अनेकांना अशक्य होऊ लागलं आहे. कामगार मिळत नाहीत म्हणून त्यांना पोसणंही कठीण झाल्याने अनेक बड्या उद्योग आणि व्यावसायिकांनी नोकर कपात केली. उच्चवर्गातील लोकांना कोरोनाची जरी भीती असली तरी रोजगाराबद्दल त्यांना चिंता नाही. आर्थिक दुर्बल असणाऱ्या घटकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून थोडीफार मदत मिळत असल्यामुळे त्यांचाही ताण कमी आहे. याचवेळी मध्यमवर्गीयांना ना कोणाकडे मदत मागता येत ना कोणाकडे व्यक्त होता येत. त्यामुळे सर्वाधिक तणाव हा मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये पाहायला मिळत आहे.
पुढं कसं होणारची चिंता !
कोविडमध्ये अनेकांना आर्थिक झळ बसली आहे. त्यामुळे बहुतांश विचार हे अर्थचक्राभोवतीच फिरतात, हे सत्य आहे. नोकरी गेली, पगार कमी झाला, शिक्षण बंद झाल्याने नोकरी कशी मिळणार, घरात कोणी पॉझिटिव्ह आलं तर त्यांचा वैद्यकीय खर्च कसा भागणार, वेळेत शिक्षण पूर्ण झालं नाही तर पुढं करिअर कसं उभं राहणार, यासारखे अनेक प्रश्न लोकांना भेडसावत आहेत. घरात बसलो तर खाण्याचे आणि बाहेर पडलो तर कोरोनाचे संकट आ वासून उभे असल्यामुळे महिला, पुरूष, तरूण यासह बालकांनाही पुढं कसं होणार, याची चिंता भेडसावत आहे.
महिलाही तणावात
कोविड काळात महिलांवर असलेला ताण त्या परस्परांशी बोलून व्यक्त करतात. शहरांमध्ये छोट्या घरात राहात असलेल्या अनेकींना आपल्या घरात बाधित रूग्ण आढळला तर काय करायचं, त्यांना विलगीकरणात कसं ठेवायचं यासह उपचारांचा आर्थिक भार कसा सोसायचा, यासारखे अगणित प्रश्न भेडसावतात. मनातल्या मनात विचार करण्याने त्यांच्यावर ताण वाढत चालला आहे.
पुरूषांचे प्रश्न
नोकरी गेली त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन थांबले आहे.
विविध बँक आणि पतसंस्थांकडून घेतलेले कर्जाचे हप्ते कसे भरू.
कोरोनावर एकदा मात केली पण दुसऱ्यांदा झाला तर कसा निभाव लागेल.
पॉर्इंटर
अव्यक्त पुरूषांची घुसमट
रडायचं, व्यक्त व्हायचं हा पुरूषांचा स्वभावच नाही. त्यामुळे त्यांच्यामधली घुसमट बऱ्याच आजारांना आमंत्रण देणारी ठरत आहे. त्यांच्या होणाऱ्या कोंडमाऱ्यामुळे ते व्यसनाधिनतेकडे वळण्याची दाट शक्यता आहे.
कोट :
कोविड काळात तणावाचे समायोजन करणे गरजेचे आहे. सारखं तणावात राहिल्याने शारीरिक व्याधी जडत आहेत. त्यामुळे सकारात्मक बाबींवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देणं आणि आपल्या भावनांचा निचरा करणं, सर्वाधिक महत्त्वाचं आहे.
- डॉ. हमीद दाभोळकर, मनोविकार तज्ज्ञ, सातारा