ठिबक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार
By Admin | Updated: August 20, 2015 20:52 IST2015-08-20T20:52:17+5:302015-08-20T20:52:17+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँक : अॅसिड ट्रिटमेंट ते पाणी वापराबाबतमार्गदर्शन,,ठिबक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार

ठिबक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार
सातारा : पीक उत्पादन वाढ व पाणी बचतीचे महत्त्व विचारात घेता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठिबक व स्प्रिंक्लरमधील राज्यातील प्रतीथयश कंपन्यांबरोबर नुकताच सामंजस्य करार केला. या करारामुळे बँकेच्या कर्जदार सभासदांना दर्जेदार माल पुरवठा होणार असून, कंपन्यांमार्फत अॅसिड ट्रिटमेंट ते पाणी वापराबाबत वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
उत्पादन व क्षेत्र वाढ होण्याच्या दृष्टीने बँकेने गतवर्षी एकरी चार हजार रुपये व चालू वर्षी एकरी पाच हजारांप्रमाणे नफ्यातून तरतूद केली असून, या कारणासाठी ५० कोटींचा स्वतंत्र निधी राखून ठेवला आहे. १ एकरासाठी बँकेने पाच हजार रुपये व कृषी विभागाचे एकरी पिकानुसार बारा हजार ते सोळा हजार असे जवळपास एकूण वीस हजार रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे.
बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बँकेची योजना यशस्वीपणे कार्यान्वित होणे, तसेच ठिबकसाठी स्वतंत्र तरतूद करण्यासाठी संचालक मंडळ सतत आग्रही भूमिका घेतली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपकुमार धरू यांनी इतर योजनांप्रमाणे याही योजनेच्या यशस्वीतेसाठी कंपन्या व शेतकरी यांनी बँकेस सहकार्य करून बँक सेवेसाठी तत्पर असल्याचे नमूद केले.यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे, फिनोलेक्स कंपनीचे सरव्यवस्थापक प्रशांत जाधव, जिल्ह्याचे वितरक अजित गुरव, जैन चे सातारा इंजिनिअर संतोष डांगे, व नेटाफेम कंपनीचे गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ठिबक संच उभारणीत बँकेचे लक्ष
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या १५ वर्षांपासून ठिबकसाठी कर्ज पुरवठा करीत आहे. बँकेने ठिबकसाठी वेळेत व पुरशा प्रमाणात कर्ज पुरवठा केल्याने ऊस व फळबाग लागवडीखालील ड्रीप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठिबक संच उभारणीत बँकेने लक्ष केंद्रित केले आहे.