सदस्यांची ‘सटकली’; पण भुईच ‘धोपटली’!
By Admin | Updated: November 5, 2014 23:42 IST2014-11-05T21:34:03+5:302014-11-05T23:42:51+5:30
कारण-राजकारण : पंचायत समितीच्या सभेत अधिकारीच धारेवर --कऱ्हाड पंचायत समितीतून...

सदस्यांची ‘सटकली’; पण भुईच ‘धोपटली’!
प्रमोद सुकरे - कऱ्हाड -विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर सोमवारी पंचायत समितीची मासिक सभा झाली़ वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरणारे सदस्य सभागृहात एका छत्राखाली आले खरे; पण शेवटी राजकारणात माहीर असणाऱ्या सदस्यांनी अधिकारीच राजकारण करीत असल्याचा आरोप करीत त्यांना फैलावर घेतले़ पण, त्यांनी ‘साप म्हणून भुईच धोपटल्याची’ चर्चा नंतर सर्वत्र सुरू झालीय !
कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला़ तालुका कृषी विभागाचे अधिकारी आढावा देण्यासाठी उभे राहताच ‘मांगले तुमचं वागणं नाही चांगले,’ अशाच सुरात तुम्ही राजकारण करीत असल्याचा आरोप एका ‘दादा’ सदस्याने त्यांच्यावर केला़ त्याला अधिकारी उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतानाच ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसणाऱ्या आणखी काही सदस्यांना मग ‘भाऊ’ आला; मग साऱ्यांनी अधिकाऱ्यांना जणू फैलावरच घेतले़
शेवटी ‘पालीच्या देवमाणसाच्या’ शिष्टाईने विषय थांबला खरा; पण विषयावर कायमचा पडदा मात्र पडला नाही़
सभेनंतर मात्र पंचायत समिती सदस्यांच्यात याची चांगलीच चर्चा रंगली होती़ काहीनी तर ‘तालुका कृषी अधिकारी कोण्या एका पुढाऱ्याचेच ऐकून काम करतात,’ असा सूर आळविला़ काहीजण म्हणाले, ‘अधिकारी हे लोकप्रतिनिधींचे ऐकणारच! अन् त्या लोकप्रतिनिधीवर कोणाचा राग असेल, तर तो त्याच्यावर काढायला हवा़ उगाच ‘साप म्हणून भुई धोपटण्यात’ अर्थ नाही़’
‘अधिकाऱ्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये,’ असंही काही सदस्य बैठकीदरम्यान म्हणाले. वास्तविक, कुठल्याच अधिकाऱ्याला राजकारणाशी काही देणे-घेणे असायला नकोच आहे़ तसे कोणी अधिकारी करत असल्यास त्याच्यावर पुराव्यासहित आरोप व्हायला हवेत़ म्हणजे, ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ व्हायला वेळ लागणार नाही़
निवडणुकीत व्यासपीठावरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांसारखे आरोप सभागृहात चुकीचे वाटतात़ अन् हो, निवडणुकीत सोयीचे राजकारण करण्यात माहीर असणाऱ्या राजकारण्यांना कोणी राजकारण शिकविण्याचे धाडस करेल, असेही वाटत नाही़ मात्र, याबाबत सभागृहात चांगलीच चर्चा रंगली
होती.
यांना कधी विचारणार जाब?
पंचायत समितीच्या मासिक सभेला काही अधिकारी नेहमी दिसतात; पण बांधकाम विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, परिवहन कार्यालय आदी कार्यालयांचे अधिकारी गेल्या काही वर्षांत सभेकडे फिरकलेलेच दिसत नाहीत़ त्यांच्या अनुपस्थितीवर अनेकदा चर्चा झाल्या; पण गुण आलेला; मात्र दिसला नाही़ त्यामुळे सभागृहात आक्रमक होणारी ही सदस्य मंडळी त्यांना कधी अन् कुठे जाब विचारणार, हा संशोधनाचा विषय आहे़
तालुका कृषी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पंचायत समिती सदस्यांना नेहमीच देतो़ ज्या योजनांची माहिती दिली नाही म्हणून काही सदस्य तक्रार करताहेत; पण सर्वच सदस्यांना तीन महिन्यांपूर्वी योजनांचे महितीपत्रक अन् मागणी अर्जाचा नमुना दिला आहे़ त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य नाही़
- शिवप्रसाद मांगले,
तालुका कृषी अधिकारी, कऱ्हाड