बैठक सांगलीत, भोजन साताऱ्यात!
By Admin | Updated: November 4, 2015 23:57 IST2015-11-04T23:11:36+5:302015-11-04T23:57:11+5:30
कृषी समिती सभा : कृषी विकास अधिकारी सहलीवर

बैठक सांगलीत, भोजन साताऱ्यात!
सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा बुधवारी सांगलीत होणार होती. त्यासाठी सर्व तालुका कृषी अधिकारी हजर झाले. मात्र कृषी विकास अधिकारी कृषी समितीच्या सदस्यांना घेऊन सकाळीच कास पठार, सज्जनगडला फिरायला गेल्याचे समजले! कृषी विकास अधिकाऱ्यांनी मात्र सांगलीत बैठक घेतल्यानंतर, जेवणासाठी आणि पर्यटनासाठी सदस्यांना घेऊन सातारा येथे गेल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. सध्या रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून, शासनाने ३५३ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी समितीच्या बैठकीत काही निर्णय होण्याची अपेक्षा होती. परंतु, कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगलीत कृषी समितीची बैठक घेण्याचे नाटक करून साताऱ्याचा दौरा केला, असे चित्र दिसून आले. कृषी समितीची बैठक होणारच नव्हती, तर, जत, शिराळा, आटपाडी, कडेगाव अशा लांबच्या तालुक्यांतून कृषी अधिकाऱ्यांना कशासाठी बोलाविले?, किमान ते जिल्हा परिषदेत येईपर्यंत तरी थांबण्याचे सौजन्य दाखविण्याची गरज नव्हती का?, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.
कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत कामाचा आढावा घेण्याऐवजी कृषी विकास अधिकारी कृषी समितीच्या सदस्यांसोबत सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, कास पठारासह अन्य ठिकाणे पाहण्यासाठी गेले. शिवाय तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा वेळ आणि त्यांच्या भत्त्यावरील हजारो रुपये खर्च वाया घालविला.
जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना, अधिकारी आणि कृषी समितीच्या सदस्यांनी असा कारभार करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. (प्रतिनिधी)
'सज्जनगडला फिरायला!
कृषी समितीची बैठक जिल्ह्याबाहेर घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते. ही सभा बाहेर घेण्यासाठी मंजुरी नसल्यामुळे आम्ही कृषी समितीची बैठक सांगली जिल्हा परिषदेतच घेतली. त्यानंतर सातारा येथील सज्जनगड येथे समिती सदस्यांना घेऊन फिरायला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी दिली.