‘कृष्णा’च्या सभेत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:07+5:302021-03-28T04:37:07+5:30
कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला पूर्णवेळ उपस्थित होतो. केवळ पन्नास व्यक्तींच्या उपस्थित सभा आयोजित ...

‘कृष्णा’च्या सभेत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत
कऱ्हाड : ‘यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला पूर्णवेळ उपस्थित होतो. केवळ पन्नास व्यक्तींच्या उपस्थित सभा आयोजित केली होती. विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले यांनी सभेचे कामकाज केवळ तीस-चाळीस मिनिटांत संपविले. चालू वर्षाच्या उसाची राहिलेली एफआरपी कधी देणार, कामगारांच्या मागण्यांबद्दल चकार शब्द काढला नाही. सभेपुढे आलेल्या ५९ पैकी कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही. माईक काढून घेतले. एकंदरीत ही सभा एक सोपस्कार होते,’ असे मत कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी कऱ्हाड येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
अविनाश मोहिते म्हणाले, ‘आमचे प्रश्न आजही कायम आहेत. अध्यक्षांनी भाषणात डिस्टिलरीचा तीस कोटी नफा झाल्याचे जाहीर केले. तो अहवालातील कोणत्या पानावर नमूद आहे? असा नफा झाला असेल, अजूनही होत असेल तर सुमारे ४५ कोटी रुपयांची एफआरपीची थकीत रक्कम आहे? ती तातडीने सभासदांच्या खात्यावर जमा करावी. ५५ कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे आधुनिकीकरण केले. त्यामुळे ११ ते १२ हजार मेट्रिक टन गाळप प्रतिदिनी होईल, असे वार्षिक अहवालामध्ये जाहीर केले. प्रत्यक्षात दोनशे ते चारशे टनच ऊस जादा गाळला जातोय. याबद्दल अध्यक्ष म्हणतात, कारखान्याचा उतारा वाढला आहे. तसे असेल तर ५५ कोटींचा खर्च उतारा वाढण्यासाठी केला की, गळीत वाढवायला? मग गळीत वाढले नसेल तर ११ ते १२ हजार टन गाळप होईल, अशा बढाया वार्षिक अहवालाच्या भाषणात कशासाठी केल्या.
संस्थापक पॅनलच्या काळात कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प कर्जमुक्त केला. त्या पाच वर्षांच्या काळात १५ कोटी ८२ लाख युनिट वीज मंडळाला विकली. मात्र, विद्यमान अध्यक्षांच्या काळात त्यात वाढ व्हायच्या ऐवजी घट झाली. ती घट दोन कोटी ८२ लाख युनिट इतकी आहे. हे अपयश आहे का? याचा त्यांनी खुलासा करायला हवा.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टबद्दलचे प्रश्न तीस वर्षांपासूनही लोकांच्या मनात आहेत. या ट्रस्टमधील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व सभासदांच्या मुलांसाठी प्रवेश राखीव होता. आता कायदे बदलले आहेत, मात्र व्यवस्थापन कोटा आहे. कारखान्याच्या मालकीच्या कृषी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून कार्यक्षेत्रातील व सभासदांच्या मुलांनाच प्रवेश दिला जातो. कारखान्याशी संबंधित व शंभर टक्के कारखान्याच्या पैशातून उभ्या राहिलेल्या ट्रस्टच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी व्यवस्थापन कोटा आहे. त्यात सभासद व कार्यक्षेत्रातील मुला-मुलींना प्रवेश द्यावा. तसा ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत करावा. अशीच आमची मागणी होती. त्याला काहीच उत्तर दिले नाही.
सभा ऑनलाइन होती. त्यात काही सभासद सहभागी झाले होते; पण त्यांना मते मांडू दिली नाहीत, सभेच्या ठिकाणी संचालकांच्या टेबलावरील माईक काढून घेतले. आम्ही विरोधक आहोत आम्हाला बोलू द्यायचे नसेल हे समजू शकतो; पण सत्ताधारी गटातील संचालकांना ही बोलायची बंदी आहे का? स्वागत, प्रास्ताविक, ठराव वाचन, ५९ प्रश्नांपैकी दोन-चार प्रश्नांना थातूरमातूर उत्तरे आणि खुद्द अध्यक्षांनीच आता सभा संपवूया, असे म्हणणे हे हजारो सभासदांनी ऑनलाइन पाहणे हे हास्यास्पद असल्याची टीकाही अविनाश मोहिते यांनी यावेळी केली.
चौकट:
मनोमिलनावर आठ दिवसांनी बोलू
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन माजी अध्यक्ष मोहितेंच्या मनोमिलनाची चर्चा आहे. याबाबत माध्यमाच्या प्रतिनिधींनी छेडले असता अविनाश मोहिते म्हणाले, याबाबत येत्या आठ दिवसांमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल.