एलबीटी हटावसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
By Admin | Updated: May 25, 2014 01:02 IST2014-05-25T00:41:03+5:302014-05-25T01:02:33+5:30
मनोहर सारडा : जाचक परवाने रद्दसाठी सांगलीच्या मेळाव्यात ठराव

एलबीटी हटावसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
सांगली : एलबीटी (स्थानिक संस्था कर) कोणत्याही परिस्थितीत हटवला गेला पाहिजे, यासाठी व्यापार्यांनी कंबर कसली असून, हा कर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगलीत निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली. सोमवारी बंददिवशी होणार्या मेळाव्यात व्यापार्यांसाठी लागू करण्यात आलेले जाचक परवाने रद्द करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की, एलबीटीला तीव्र विरोध असतानाही आघाडी सरकारने तो कायम ठेवला. याबाबत लोकसभा निवडणुकीपर्यंत काहीही निर्णय घेतला नाही. याचा राग व्यापार्यांनी व्यक्त केला आहे. आतातरी शासनाने यामधून बोध घ्यावा. कर भरण्यास व्यापार्यांचा विरोध नाही, मात्र कर पध्दतीला विरोध आहे. व्हॅटवर सरचार्ज लावून हा कर वसूल करण्यात यावा. एलबीटी हटावसाठी सोमवारी सांगली बंद पुकारला असून, यावेळी व्यापार्यांच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेण्यात येणार आहे. एलबीटीविरोधी हा आमचा अंतिम लढा आहे. यामध्ये सर्व व्यापारी, उद्योजकांनी व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावे. अन्नधान्य व औषध प्रशासनाकडून व्यापार्यांवर परवान्यासाठी अनेक जाचक अटी लागू करण्यात आल्या आहेत. हा परवाना रद्द करण्याच्या मागणीचा ठराव सोमवारच्या मेळाव्यात करण्यात येणार आहे. एलबीटी रद्द होईपर्यंत चेंबर आॅफ कॉमर्स व्यापार्यांच्या माध्यमातून लढा देणार आहे. एलबीटी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांना सांगलीत बोलावण्यात येणार आहे. त्यांना निमंत्रण देण्यासाठी लवकरच आमचे शिष्टमंडळ जाणार आहे. एलबीटीसंदर्भात व्यापार्यांमध्ये मतभेद सुरू आहेत. याबाबत आमची भूमिका स्पष्ट करू, काही गट निर्माण झाले असल्यास त्यांच्याशी चर्चा करुन सर्वसमावेशक संघटना स्थापन करु, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)