शंभर फुटी रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By Admin | Updated: March 4, 2016 00:57 IST2016-03-03T22:52:03+5:302016-03-04T00:57:40+5:30
पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडला रस्त्यासह प्रीतिसंगम बागेच्या विकासकामांना प्रारंभ

शंभर फुटी रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
कऱ्हाड : ‘कऱ्हाडच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. शहराच्या दुसऱ्या सुधारित विकास आराखडा मंजुरी दरम्यान मलकापूरला जाणारा रस्ता शंभर फुटी प्रस्तावित करण्यात आला होता. शंभर फुटी रस्त्याच्या आरक्षण बदलाची प्रक्रिया शासन पातळीवर सुरू झाली असून, योग्य वेळी नगरसेवकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण समाधी परिसर, प्रीतिसंगम बाग सुशोभीकरण व कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या ११ कोटींच्या रस्ता सुधारणेचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा संगीता देसाई, उपनगराध्यक्ष सुभाष पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगसेवक जयवंत पाटील, श्रीकांत मुळे, अप्पा माने, सुहास पवार, बांधकाम सभापती हणमंत पवार, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, नगरसेविका संगीता शिंदे आदींसह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया रचण्याचे कार्य केले. त्यांना अभिप्रेत असणारी प्रीतिसंगम बाग ही दिवंगत पी. डी. पाटील यांनी निर्माण केली. या बागेच्या नूतनीकरणासाठी जन्मशताब्दी निधीतून ३ कोटी निधी दिला आहे. हद्दवाढीमुळे शहराच्या वाढीला वाव मिळाला आहे. कऱ्हाडचे वैशिष्ट्य टिकविण्याची जबाबदारी आपणासर्वांची असून, भविष्यात शहराचा विकास साधण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावा लागला तरी तो करू.’ यावेळी आनंदराव पाटील, नगराध्यक्षा संगीता देसाई, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. बांधकाम सभापती हणमंत पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)