वाळूचोरांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:32+5:302021-02-13T04:37:32+5:30
कराड/ मलकापूर : येथील प्रीतिसंगमावरच छोट्या वाहनांवरून वाळू वाहतुकीचा रात्रीस खेळ सुरू होता. प्रशासनाला ठेंगा दाखवत चोरट्यांनी ...

वाळूचोरांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना
कराड/ मलकापूर : येथील प्रीतिसंगमावरच छोट्या वाहनांवरून वाळू वाहतुकीचा रात्रीस खेळ सुरू होता. प्रशासनाला ठेंगा दाखवत चोरट्यांनी धोकादायक खड्डे पाडले आहेत. अशा अवैध वाळूचोरांकडे पालिकेसह महसूल प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत वाळूचोरांना अटकाव करण्यासाठी तातडीने उपाययोजना करत मोठी चर काढली.
न्यायालयाने स्थगिती दिल्याने यावर्षी वाळूचे लिलाव झालेले नाहीत. पाऊस चांगला झाल्याने कृष्णा नदीसह प्रमुख नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहे. सध्या ९ ते ११ हजार रुपये ब्रासप्रमाणे वाळूची विक्री होत आहे. त्यामुळे काही वाळू व्यावसायिकांनी पूर्वीच्या ठिय्यांतूनच चोरून वाळू विक्रीचा उद्योग सुरू ठेवला आहे. प्रीतिसंगम परिसरात तर दुचाकीसह लहान वाहनातून चोरटा वाळू उपसा सुरूच आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या संरक्षक भिंतीला धोकादायक ठरणारा खड्डा निर्माण झाला आहे. हळू हळू वाळूचोरांनी संगमेश्वर मंदिराजवळच मोठे खड्डे पाडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या वाळू चोरीत पाडलेल्या खड्ड्यात संरक्षक भिंतीचे दगड व जाळी उघडी पडली आहे. शुक्रवारी रात्री वाळूचोरांनी कहरच केला असून, संगमेश्वरपासून नदीपात्राकडे जाण्याच्या रस्त्यावरच धोकादायक खड्डे पाडले आहेत. पोहणाऱ्यांसह नदीपात्राकडे जाणाऱ्या नागरिकांच्या व स्मृती स्थळाला निर्माण होणारा धोका थांबविण्यासाठी या भुरट्या वाळूचोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिध्द करताच त्याची दखल घेऊन वाळूचोरांना अटकाव करण्यासाठी मोठी चर काढली. तातडीने उपाययोजना केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
फोटो ओळ :
कराड येथे कृष्णा नदीपात्रातील वाळूची चोरी होत आहे. त्यामुळे तयार झालेले खड्डे.