मायणीच्या पुढाऱ्यांना नेहमीच पोटशूळ
By Admin | Updated: March 2, 2016 00:56 IST2016-03-01T23:08:49+5:302016-03-02T00:56:17+5:30
जयकुमार गोरे : बनपुरी येथील सभेत विरोधकांवर टीकास्त्र

मायणीच्या पुढाऱ्यांना नेहमीच पोटशूळ
वडूज : ‘माझ्या राजकीय कारकिर्दीत मी नेहमीच प्रस्थापितां विरोधात यशस्वीपणे लढत आलो आहे. मी शब्द दिल्याप्रमाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधतोय आणि उरमोडीचे पाणीही आणतोय, मात्र खटाव तालुक्यातील खास करून मायणीच्या गळक्या पुढाऱ्यांना माझा नेहमीच पोटशूळ उठतो. जनतेने सलग दुसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून मला विधानसभेवर पाठविले आहे. माझी बांधिलकी माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेशी आहे. अस्तित्वासाठी धडपडणाऱ्यांकडे लक्ष द्यायला मला वेळच नाही,’ असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी
लगावला.
बनपुरी, ता. खटाव येथे विविध विकासकामांच्या शुभारंभानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी सभापती अशोकराव गोडसे, पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, सरपंच रामभाऊशेठ देवकर, माढा लोकसभाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, धोंडिबापू मोरे, विशाल बागल, संजीव साळुंखे, अॅड. सूरज पाटील, डॉ. झेंडे, भास्कर खरात, राजेश निकम, अॅड. संतोष पवार, उद्धवशेठ पाचवडकर, उपसरपंच आनंदरावशेठ मसूरकर, देवा पाटील, अनिल माळी, अकिल काझी, आबा देवकर, दिनकर देवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोरे म्हणाले, ‘प्रत्येक निवडणुकीत मला प्रस्थापितां विरोधात संघर्ष करावा लागला. त्यांना जयकुमार आजपर्यंत समजलाच नाही. जयकुमार बाबतचा त्यांचा प्रत्येक अंदाज चुकत गेला. माणदेशी जनतेच्या पाठिंब्यावर मी त्यांचे प्रत्येक आव्हान परतवून लावले. जयकुमारने जनता जागृत केली. विकासाचे दाखविलेले स्वप्न पूर्ण केले. पाणी आणले म्हणूनच त्यांना माझा पोटशूळ उठतो. मी आणलेले पाणी त्यांना दिसत नाही. बांधलले शेकडो बंधारे दिसत नाहीत. मात्र अस्तित्वासाठी धडपडणारे विरोधक माझ्यावर खोटे बोलून प्रसिद्धी मिळवित आहेत. मायणीकर पुढाऱ्यांची तर बातच न्यारी आहे. एकाला स्वत:चा पक्षच माहीत नाही. निवडून कोणत्या पक्षातून येतो, पद कोणत्या पक्षातून मिळवितो, स्वार्थ कुठे साधतो आणि कधी कोलांटी घेतो हेच त्याला समजत नाही. दुसरे पुढारी तर एक पायरी पुढेच आहेत. रंग बदलण्यात ते माहीर आहेत.’
कार्यक्रमात बनपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सरपंच रामभाऊशेठ देवकर, उपसरपंच आनंदराव देवकर व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अशोकराव गोडसे, आनंदराव देवकर, धोंडिबापू मोरे, देवा पाटील आदींनी मनोगत व्यक्त करताना खटाव तालुक्यातून आ. गोरेंच्या पाठीशी वाढती ताकद उभी करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमास धनंजय चव्हाण, प्रकाश देवकर, श्रीरंग देवकर, भगवान देवकर, मधुकर पाटील, राजेश देवकर, दिलीप पाटोळे, संजय पाटोळे, प्रकाश नाशिकवाले, गोरख देवकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सभासद जागृत झाल्यावर क्रांती होते...
जिल्हा बँकेविरोधातील आंदोलनाबाबत बोलताना आ. गोरे म्हणाले, ‘मी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केले. विदर्भातील सहकारी बँका, संस्था बुडीत गेल्याने तिकडे खासगी सावकारी बोकावली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. मला आपल्या भागातील सहकार तशा पद्धतीने बुडवायचा नाही. बँक नियमाप्रमाणे चालावी इतकीच माझी मागणी होती. माझ्या आंदोलनाचा अंदाज राष्ट्रवादीला आला नाही; पण आंदोलनाच्या धसक्याने त्यांना माझ्या कार्यकर्त्यांच्या पाया पडावे लागले. जेव्हा संरक्षकच भक्षक होतो तेव्हा बँक बुडते आणि सर्वसामान्य शेतकरी सभासद जागृत झाल्यावर क्रांती होते हे त्यांच्या लक्षातच आले नाही.