सातारा : सातारा जिल्ह्यासाठी ‘मे’ महिना कर्दनकाळ ठरला आहे. एकाच महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असताना सर्वाधिक मृत्यूदेखील याच महिन्यात झाले आहेत. साताऱ्यातील संगममाहुली स्मशानभूमीत एकट्या मे महिन्यात तब्बल ९४९ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, वर्षभरातील हा सर्वात मोठा आकडा आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजविला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवे उच्चांक गाठत आहे. संक्रमण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात असले तरी बाधित व मृतांची वाढती संख्या अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांवर साताऱ्यातील संगममाहुली, फलटण तालुक्यांतील कोळकी, कऱ्हाड व मलकापूर येथे अंत्यसंस्कार केले जातात. आतापर्यंत सर्वाधिक अंत्यसंस्कार हे साताऱ्यातील संगममाहुली स्मशानभूमीत झाले आहेत.
एप्रिल महिन्यात या स्मशानभूमीत तब्बल ५३५ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मे महिन्यात थोडा दिलासा मिळेल असे वाटत असताना मृतांच्या आकड्याने देखील उच्चांक गाठला. मे महिन्यात तब्बल ९४९ मृतांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
(चौकट)
नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यास नैसर्गिक मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. एप्रिल २०२० ते मे २०२१ या तेरा महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक मृत्यू झालेल्या १९११ तर २८२८ कोरोना मृतांवर संगममाहुली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
(पॉइंटर)
कैलास स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार
महिना मृत्यू
कोविड इतर
एप्रिल ३ ९६
मे १४ १३०
जून २० १३४
जुलै ५६ १०७
आॅगस्ट २०४ १५२
सप्टेंबर ४२३ १५६
आॅक्टोबर २४६ १४६
नोव्हेंबर १२३ १३९
डिसेंबर ८७ १६५
जानेवारी ५३ १३२
फेब्रुवारी ५० १२७
मार्च ६५ १३२
एप्रिल ५३५ १४७
मे ९४९ १४८