माउलींच्या दर्शनाला दोन किलोमीटर रांग!
By Admin | Updated: July 17, 2015 23:00 IST2015-07-17T23:00:20+5:302015-07-17T23:00:20+5:30
भक्तीचा महापूर : लोणंदकरांच्या पाहुणचाराने भारावला वैष्णवांचा मेळा

माउलींच्या दर्शनाला दोन किलोमीटर रांग!
शरद ननावरे/राहिद सय्यद ल्ल खंडाळा/लोणंद :
संपत्ती सोहळा नावडे मनाला
लागला टकळा पंढरीचा,
जावे पंढरीशी आवडी मनाशी
कै एकादशी आषाढी ये !!
आषाढी वारीच्या निमित्ताने निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा लोणंदनगरीमध्ये भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखी माउलींचा जयघोष, यामुळे अवघी लोणंदनगरी भजन-कीर्तनात तल्लीन झाली आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून वारीला येणारे हजारो भाविक माउलींच्या दर्शनासाठी लोणंदला दाखल होतात. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातूनही येणारे वारकरी पालखी सोहळ्यात सामील होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतात. लोणंदमध्ये माउलींचा दोन दिवसांचा मुक्काम असतो. त्यामुळे शुक्रवारी दर्शनासाठी लाखोंच्या जनसमुदायाचा महापूर पसरला
होता.
माउलींच्या दर्शनासाठी तब्बल दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. सर्वांना रांगेत दर्शन घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला सज्ज राहावे लागले. कोणतीही विश्रांती न घेता चोवीस तास माउलींच्या दर्शनरांगा सुरू होत्या. आपल्या भोळ्या भक्तांना दर्शनासाठी माउलींही रात्रभर जाग्याच होत्या.
पालखीतळातून ते सातारा रस्त्यावर महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अवघी नगरी दुमदुमली होती. लोणंदकरही वारकऱ्यांच्या सेवेत न थकता रममाण झाले होते.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लोणंदनगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिठाई, खेळणी, घरगुती वापराच्या वस्तू तसेच इतर विक्रेत्यांची दुकाने गजबजलेली होती.
वारकऱ्यांचाही येथे दोन दिवसांचा मुक्काम असल्याने आपल्या साहित्याची दुरुस्ती करण्याची कामे सुरू होती. लोणंदकरही आपले निजी कामे बाजूला ठेवून माउलींच्या सेवेत तल्लीन होते. लोणंदकरांसाठी हा अनुभव बळ देणारा ठरतो.
पोलिसांचा बंदोबस्त
आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी लोणंद मुक्कामी होता. गर्दीत अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मनोऱ्यावरून टेहाळणी करणारा एक पोलीस जवान गर्दीवर लक्ष ठेवून होता. अशा प्रकारचे मनोरे विविध ठिकाणी उभारले असल्याने पालखी सोहळा उत्साहात पार पडत आहे.
दर्शन ज्ञानोबा माउलींचे
लोणंदमध्ये माउलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती. तब्बल तीन-चार तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्येकाचा नंबर येत होता. दर्शन घेताना केवळ क्षणभरच डोके टेकवू दिले जात होते; पण हेही नसे थोडके एवढं दर्शन म्हणजे आयुष्याचं कल्याण, असं माणणारे लाखो भाविक तासन्तास रांगेत उभे राहिले. सर्व धर्म समभावाचे दर्शन याठिकाणी पाहायला मिळाले. माउलींच्या दर्शनासाठी विविध धर्माची जातींच्या लोकांचे पाय लोणंदकडे चालत होते. त्यामुळे भक्तांचा मेळा पाहायला मिळाला. सारी वारी सुरळीत पार पडण्यासाठी झटणारी खाकी वर्दीतही माणूस आहे. याचे दर्शन लोणंदमध्ये पहायला मिळाले. वेळात वेळ काढून एका पोलीस कर्मचारीने माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.