महानुभवांच्या दक्षिण काशीत माउली मुक्कामी!

By Admin | Updated: July 19, 2015 23:35 IST2015-07-19T22:54:50+5:302015-07-19T23:35:47+5:30

फलटणमध्ये स्वागत : आळंदीहून निघालेला पालखी सोहळा निम्म्या अंतरावर पोहोचला

Mauli mukami in south Kashi | महानुभवांच्या दक्षिण काशीत माउली मुक्कामी!

महानुभवांच्या दक्षिण काशीत माउली मुक्कामी!

फलटण :
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे
तुटेल धरणे प्रपंचाचे...
हरिपाठातील ओव्या म्हणत पंढरीच्या विठू दर्शनासाठी आसुसलेला वैष्णवांचा मेळा रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महानुभवांची दक्षिण काशी असलेल्या फलटणनगरीत मुक्कामासाठी स्थिरावला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ऐतिहासिक प्रभू श्रीरामांच्या फलटणनगरीत आगमन झाले, त्यावेळी सारे शहर ‘ज्ञानोबा माउलीं’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला वैष्णवांचा मेळा आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या सोहळ्याने निम्मे अंतर कापले आहे. फलटण शहराच्या सीमेवर जिंती नाक्याजवळ नगराध्यक्षा सारिका जाधव यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक सोमाशेठ जाधव, नितीन भोसले, सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी सोहळ्यातील मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिंती नाका येथून माउलींचा रथ मलठण, संत हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक मार्गे ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाडा व प्रभू श्रीरामांच्या मंदिरासमोर येताच माउलींचे स्वागत राजघराण्याच्या वतीने यशोधराराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंदनगर मार्गे सायंकाळी विमानतळावरील प्रशस्त मुक्कामाच्या ठिकाणी विसावला. याठिकाणी चोपदारांनी हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंचे निवेदन केले. काही सूचना केल्यानंतर समाजआरती झाली. त्यानंतर वारकरी आपापल्या मुक्कामाच्या जागेवर रवाना झाले. (प्रतिनिधी)

वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम
फलटणमधील नागरिकांनी वारकऱ्यांसाठी घरोघरी भोजनाची सोय केली होती. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे यांनीही चहा-नाष्टा, भोजनाची व्यवस्था केली होती.
अनेक मंडळांनी विविध उपक्रम राबवून सेवा केली. मराठी पत्रकार सामाजिक सेवा संस्थेतर्फे भाविकांची मोफत चप्पल, बूट शिवणे, फाटके कपडे शिवणे, मोफत सलून असे उपक्रम राबविण्यात आले.
आॅल इंडिया रिपोर्टर असोसिएशनतर्फे भाविकांसाठी मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी शिबिर घेतले.

Web Title: Mauli mukami in south Kashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.