प्रसूतीनंतर तिसऱ्याच दिवशी मातेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:45+5:302021-08-25T04:43:45+5:30
सुरेखा अर्जुन माने (वय ३०, रा. वडार वस्ती, कऱ्हाड) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ...

प्रसूतीनंतर तिसऱ्याच दिवशी मातेचा मृत्यू
सुरेखा अर्जुन माने (वय ३०, रा. वडार वस्ती, कऱ्हाड) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वडार वस्तीमध्ये राहणाऱ्या सुरेखा माने यांना नातेवाईकांनी गुरूवार, दि. १९ रोजी प्रसूतीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सुरेखा यांचे सिझर झाले. त्यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर दिवसभर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र, शनिवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे कृष्णा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिक मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुरेखा माने यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी जमावाने केली. यावेळी ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पिसाळ, विभागीय जिल्हाध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष आनंदा सावंत, दशरथ धोत्रे, महेश अलकुंटे, नवनाथ पवार, अनिल चौगुले, श्रीकांत भोसले, अमोल शिंदे, महेश धोत्रे यांच्यासह सुरेखा यांचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते. दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जमावाने केली. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जमावाशी चर्चा करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तणाव निवळला.
- चौकट
तीन दिवसांचे मूल पोरके
सुरेखा यांनी जन्म दिलेल्या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला नातेवाईकांनी ताब्यात घेतले आहे. सध्या ते मूल नातेवाईकांसोबत घरी आहे. मात्र, तिसऱ्याच दिवशी ते मूल आईच्या प्रेमाला पोरके झाले असून या मुलासह त्याच्या मोठ्या भावाच्या पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी नातेवाईकांसह ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
फोटो : २४सुरेखा माने
कॅप्शन : मृत सुरेखा माने
फोटो : २४केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात मातेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.