फलटण तहसील कार्यालयातील संगणाकासह साहित्य चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:30+5:302021-02-05T09:10:30+5:30
फलटण : फलटण तहसील कार्यालयातील महसूल शाखेतून अज्ञात चोरट्याने कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, केबल ,राउटर असे सुमारे ...

फलटण तहसील कार्यालयातील संगणाकासह साहित्य चोरीस
फलटण : फलटण तहसील कार्यालयातील महसूल शाखेतून अज्ञात चोरट्याने कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, केबल ,राउटर असे सुमारे दोन लाख ७०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. चोरीस गेलेल्या संगणकामध्ये तहसील कार्यालयातील गोपनीय दस्तऐवज होता. त्यामुळे महसूल खात्यामध्ये खळबळ उडाली आहे.
फलटणमधील तहसील कार्यालयातील व्हरांड्याच्या नोटीस बोर्डवर ठेवलेली चावी अज्ञात चोरट्याने घेतली. त्या चावीने दरवाजा उघडून आत प्रवेशही केला. कार्यालयातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, केबल ,राउटर, आदी साहित्य चोरट्याने लंपास केले. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर फलटणमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन श्वानपथकालाही पाचारण केले. तहसील कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती तसेच दस्तऐवज या कॉम्प्यूटरमध्ये असल्याने या चोरीविषयी अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. माहीतगारानेच ही चोरी केली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, या चोरीचा तत्काळ छडा लागणे गरजेचे आहे. संगणकामध्ये कार्यालयातील गोपनीय माहिती होती. ही माहिती मिळविण्यासाठी की नष्ट करण्यासाठी चोरी झाली, याबाबत आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे. या चोरीमध्ये दोन ते तीनजणांचा समावेश असण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.