‘माण’चा आमदार ‘खटाव’च्या हाती
By Admin | Updated: October 17, 2014 22:54 IST2014-10-17T21:31:04+5:302014-10-17T22:54:14+5:30
माणचा ‘मानकरी’ कोण : मतदानाचा टक्का वाढला; गतवेळच्या तुलनेत तीन टक्के अधिक मतदान

‘माण’चा आमदार ‘खटाव’च्या हाती
मताच्या विभागणीवर गणित अवलंबून...
माण विधानसभा मतदारसंघात संपूर्ण माण तालुका आणि खटाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. खटाव तालुक्यातून यावेळी फक्त एकच उमेदवार होता. त्यामुळे येथे स्थानिकतेचा मुद्दाही तितकाच लक्षवेधी ठरला आहे. खटाव तालुक्यातील चार गटांत १.३५ लाख इतके मतदान आहे. येथे झालेले एकूण मतदान हे ८८ हजारांच्या आसपास आाहे. त्यामुळे यापैकी स्थानिक उमेदवाराला किती मते मिळणार आहेत, यावरही निकालाचे बहुतांशी गणित अवलंबून असणार आहे. माण तालुक्यातील पाच उमेदवार येथे नशीब आजमावत आहेत. त्यांच्याही मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे खटाव तालुका सवार्त निर्णायक ठरणार आहे.
म्हसवड : माण विधानसभा मतदारसंघात चुरशीने मतदान झाले असलेतरी उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे येथील मतदानाची टक्केवारी ८0 ते ८५ टक्केंच्या आसपास जाईल, अशी शक्यता होती. मात्र ती फोल ठरली आणि येथील एकूण मतदानाची आकडेवारी ७0.३८ टक्के इतकी समोर आली. त्यातच मतदानाचा टक्का कधी नव्हे ते अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याकडे आता अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
माण विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ९ हजार ४४२ इतके मतदान असून बुधवार, दि. १५ रोजी झालेल्या मतदानादिवशी २ लाख १७ हजार ७८३ इतके मतदान झाले. माण विधानसभा मतदारसंघात संपूर्ण माण आणि खटाव तालुक्याचा काही भाग समाविष्ट केला आहे. माण तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट तर खटाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट यामध्ये आहेत. माण तालुक्यात १.७५ लाख तर खटाव तालुक्यात १.३५ लाख इतके मतदान आहे.
माण विधानसभा मतदारसंघात एकूण बारा उमेदवार नशीब आजमावत आहेत. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ‘थ्री एम’चा वापर झाल्यामुळे अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे होत्या. येथे विकासकामांचा मुद्दा तर महत्त्वाचा तर होताच त्याचबरोबर पक्ष आणि व्यक्ति म्हणूनही अनेक ठिकाणी मतदान झाल्याची माहिती पुढे आली आहे. माण मतदारसंघातील वातावरण गेली वर्षभर तापले होते. अनेकांनी त्या दृष्टीनेच शड्डू ठोकला होता. त्याची प्रचितीही निवडणूक कालावधीत संपूर्ण जिल्ह्याला आली.
मतविभागणीचा धोका कोणाला..?
1माण विधानसभा मतदारसंघात २00९ मध्ये १३ उमेदवार रिंगणात होते. यावेळी १२ उमेदवार आहेत. गतवेळी ६७.0८ टक्के इतके मतदान झाले होते. मात्र, यावेळी मतदानानंतर मतदारसंघात ७0.३८ टक्के इतके मतदान झाले आहे. गतवेळचा आणि यावेळचा वाढलेल्या मतांचा विचार करता त्या प्रमाणातील लोकसंख्याही गृहीत धरली आहे. त्यामुळे वाढलेल्या चार टक्के मतांवर उमेदवारांची मदार असलीतरी मताची विभागणीही अनेकांसाठी धोक्याचा इशारा देणारी ठरणार असल्याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे.
हे आहेत उमेदवार...
2माण विधानसभा मतदारसंघातील लढतही पंचरंगी झाली. त्यामुळे येथे मोठी रस्सीखेच होती. मात्र, कोणाला लॉटरी लागणार हे रविवार, दि. १९ रोजीच समजणार आहे. मतदारसंघात काँग्रेसचे जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे सदाशिवराव पोळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे शेखर गोरे, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, मनसेचे धैर्यशील पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार असलेतरी ते किती मते खातात यावरही निकालाचे चित्र अवलंबून असणार आहे. उमेदवार बारा असून प्रमुख लढतही चार उमेदवारांमध्येच होणार आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार याकडे नजरा आहेत.