पाटण तालुक्यातील युवकांसाठी मास्टर प्लॅन
By Admin | Updated: December 21, 2015 00:53 IST2015-12-20T22:53:41+5:302015-12-21T00:53:21+5:30
शंभूराज देसाई : अनेकांनी भूकंपग्रस्तांना दाखल्यापासून वंचित ठेवले

पाटण तालुक्यातील युवकांसाठी मास्टर प्लॅन
पाटण : भूकंपग्रस्त दाखले देण्याचा निर्णय हा पाटण तालुक्यासाठी ऐतिहासिक असून, १९९५ मध्ये शासनाने बंदी केलेले दाखले आता मिळणार आहेत. त्यावेळी तालुक्याचे नेतृत्त्व करत असलेले विक्रमसिंह पाटणकर हे केवळ आमदारच नव्हते तर मंत्री होते. त्यावेळी भूकंपग्रस्त दाखल्यांचे काम करून घेणे हे त्यांच्यासाठी एका तासाचे काम होते. परंतु तालुक्याच्या दादांनी २० वर्षे भूकंपग्रस्तांना दाखल्यापासून वंचित ठेवले, असा आरोप आमदार शंभूराज देसाई यांनी केला. युवकांसाठी मास्टर प्लॅन करणार आहे असेही ते म्हणाले.नागपूर अधिवेशनातून शनिवारी पाटण तालुक्यात आगमन झाल्यानंतर आमदार देसार्इंचे भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले. तर दाखले मिळाले म्हणून साखर-पेढे वाटून आनंद साजरा केला.दौलतनगर येथे बोलताना देसाई म्हणाले की, ‘तालुक्याच्या दादांनी केवळ हाताची घडी तोंडावर बोट ठेवून तालुक्यातील भूकंपग्रस्तांना २० वर्षे वाट पाहायला लावली. तालुक्यातील तरुणांना आपल्या हक्काच्या दाखल्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रधर्म पाळला. मी मुख्यमंत्री व महसूलमंत्री ना. एकनाथ खडसे यांचा आभारी आहे. (प्रतिनिधी)