जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मसूर संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST2021-03-17T04:39:35+5:302021-03-17T04:39:35+5:30
संघर्ष क्लब उपविजेता : संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण मसूर : जिल्हा अमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व संघर्ष क्लबच्यावतीने ...

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मसूर संघ विजेता
संघर्ष क्लब उपविजेता : संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
मसूर : जिल्हा अमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व संघर्ष क्लबच्यावतीने कवठे, ता. कऱ्हाड येथे सतरा वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मसूर क्रीडा मंडळ व कवठेतील संघर्ष क्लब या दोन संघात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मसूर संघाने बाजी मारली.
कवठे संघास दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिसरा क्रमांक सोनवडी - गजवडी, तर चौथा क्रमांक ओगलेवाडी संघाने पटकावला. विजेत्या संघास प्रशांत उर्फ गोल्डन पवार यांच्याकडून ९ हजार ९९९ रुपये बक्षीस व करंडक, उपविजेत्या संघास राजेंद्र साळुंखे, प्रकाश चव्हाण यांच्याकडून ७ हजार ७७७ रुपये व करंडक, तृतीय क्रमांकास अनिकेत चव्हाण, नीलेश साळुंखे यांच्याकडून ५ हजार ५५५ रुपये व करंडक, चतुर्थ क्रमांकास शिवाज्ञा मंडळाकडून ३ हजार ३३३ रुपये व करंडक प्रदान करण्यात आला. सर्व करंडक अतुल चव्हाण, वैयक्तिक बक्षिसे चैतन्य मदने, विजेत्या खेळाडूंना मेडल्स कलाराज फोटो स्टुडिओ व विजय साळुंखे, फायनलच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूस भलरी रोपवाटिकेतर्फे ट्रॉफी देण्यात आली, तर संगीता साळुंखे यांनी स्वत: पंच व उत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षिसे दिली.
स्पर्धेस राष्ट्रीय खेळाडू योगेश मोरे यांनी भेट दिली. सर्व खेळाडू व प्रेक्षकांनी शासनाच्या कोरोना नियमांचे पालन केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, गोल्डन पवार व प्रायोजकांच्या हस्ते पार पडला.
फोटो : १६केआरडी०५
कॅप्शन : कवठे, ता. कऱ्हाड येथे खो-खो सामन्यातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संगीता साळुंखे, गोल्डन पवार आदी उपस्थित होते.