मास्कच्या आडून फोफावतेय गुन्हेगारी!

By Admin | Updated: August 1, 2016 00:35 IST2016-08-01T00:35:57+5:302016-08-01T00:35:57+5:30

भर पावसात म्हणे धुराळा फार : फलटणच्या घटनेने डोेळे उघडले; बंदी घालण्याची मागणी

Masked crime foetate! | मास्कच्या आडून फोफावतेय गुन्हेगारी!

मास्कच्या आडून फोफावतेय गुन्हेगारी!

सातारा : अंगाची लाहीलाही करणारे ऊन, धुराळ्यापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत तोंडाचे मास्क आहेत; पण या मास्कच्या आडून गुन्हेगारी फोफावू लागली आहे. त्यामुळे या मास्कवर तत्काळ बंदी आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
फलटण येथील पाचबत्ती चौकात कोणीतर अंधाराचा फायदा घेऊन लपून बसल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशीसाठी प्रयत्न करत असतानाच तोंडाला मास्क बांधून पळून जाऊ लागले. त्यांना पाठलग करून पकडले असता त्यांच्याकडे दोन एअर पिस्टलसह इतर साहित्य आढळून आले. या घटनेमुळे पोलिसांबरोबरच सर्वांचीच झोप उडाली आहे.
ऊन, वारा, पावसापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी नवनवीन साधने बाजारात येत असतात. ती काळाची गरजही असू शकते. त्याचा गैरवापर करण्यावर तरुणांचा भर वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा साधनांवर वेळीच बंदी घालण्यासाठी हालचाली होणे गरजेचे आहे.
मास्कची खरी गरज उन्हाळा अन् हिवाळ्यात सर्वाधिक भासू शकते. कडक उन्हामुळे त्वचा काळवंडणे, पुरळ येणे, गरम हवा लागल्याने डोके दुखणे असा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे मास्कचा वापर केला जातो. तसेच हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बचाव व्हायला हवा; परंतु, भर पावसातही काही तरुण मास्कचा वापर करत असल्याचे जाणवत आहे. मास्क वापरणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. (प्रतिनिधी)
ओळख लपते सहज
ओळखीचा माणूस जर्कीन अन् तोंडाला मास्क बांधून शेजारून गेला तरी सहजासहजी लक्षात येत नाही. या मास्कमुळे डोळे सोडले तर संपूर्ण चेहरा झाकला जातो. त्यामुळे गुन्हे करणारे सहज पसार होतात. कोणीही ओळखलेले नसल्याने समाजात उघड माथ्याने फिरतात.
नाईन इन वन
मास्कमध्ये विविध प्रकार आहेत. नवीन एक पट्टी रुमाल बाजारात आले आहेत. सुमारे चाळीस रुपये किमतीच्या या रुमालाचा नऊ प्रकारे चेहरा लपविण्यासाठी वापर करता येतो. हे प्रकार रुमालाच्या पॅकिंग पिशवीवर प्रसिद्ध केले आहेत.
प्रिंटेड रुमाल
काही रुमाल हे काळ्या रंगाचे असून, त्यावर पांढऱ्या रंगाने प्रिंटिंग केलेले असते. मानवी सापळा, कवटी यासारखे प्रिंट केलेले हे रुमाल भुताचा रुमाल म्हणूनही ओळखला जातो. अंधारात हे रुमाल वापरल्यास महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते.
सोनसाखळी चोरीत वाढ
सातारासह उपनगरांमध्ये एकट्या दुकट्या महिला चालत निघाली असता समोरून तोंडाला मास्क बांधून काही तरुण दुचाकीवरून येतात. दुचाकीवरील दोन्ही तरुण तोंडाला मास्क बांधलेले असतात. गाडी महिलांच्या जवळ गेली असता मंगळसूत्राला हिसका मारून चोरून नेण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली होती. तसेच कमी किमतीत हे विविध रंगांमध्ये उपलब्ध असल्याने काही वेळांनंतर एक मास्क काढून दुसरा बांधला जातो.
मास्क बांधणारे सारेच मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असे नाही. लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना उन्हामुळे त्रास होतो. त्यामुळे आम्ही मास्क वापरतो.
- राजेंद्र यादव, सातारा

Web Title: Masked crime foetate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.