इच्छुक ‘मंगळा’च्या कक्षेत!
By Admin | Updated: September 25, 2014 00:23 IST2014-09-24T23:25:30+5:302014-09-25T00:23:31+5:30
पितृपक्ष संपला : मुहूर्ताची शोधाशोध सुरू; गुरुवार-शुक्रवारवर डोळा

इच्छुक ‘मंगळा’च्या कक्षेत!
राजीव मुळ्ये - सातारा ‘इस्रो’चे यान आणि इच्छुक उमेदवार एकाच वेळी ‘मंगळा’च्या कक्षेत पोहोचले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगल मुहूर्ताची शोधाशोध सुरू झाली असून, येत्या गुरुवार-शुक्रवारचा मुहूर्त अनेकांकडून पकडला जाईल, अशी शक्यता आहे. पक्ष असो वा अपक्ष, पितृपक्ष संपल्याने प्रतिपक्षाला आपल्या शक्तीच्या कक्षा दाखवण्यास सगळेच दक्ष झाले आहेत.
महायुती आणि आघाडीतील वरिष्ठ पातळीवरची रस्सीखेच पितृपक्षाबरोबरच संपुष्टात येऊन तडजोडीचे ‘घट’ नवरात्रारंभी बसविले जातील, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. युती अभंग राहिली; पण महायुती तुटली. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार रिंगणात असणारच, असे चित्र आहे. आता भाजप आणि शिवसेना यांंच्यात जिल्ह्यातील जागांची विभागणी कशी होते, यावर बंडखोरांची संख्या ठरणार आहे. परंतु उमेदवारांची संख्या सर्वच मतदारसंघांत वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे.
पितृपक्ष सुरू असतानाच अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठीचा मुहूर्त जाणकारांना विचारण्यास सुरुवात केली होती. ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांंचे उंबरठे झिजवून अनेकांनी योग्य दिवस आणि वेळ शोधून आणली आहे. प्राप्त माहितीनुसार, येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी (दि. २५ आणि २६) उत्तम मुहूर्त असल्याचे ज्योतिषांनी इच्छुकांना सांगितले आहे. शनिवारी (दि. २७) मात्र ‘वैध्रती’ योग असून, तो अशुभ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे शनिवारी अर्ज भरले जाणार नाहीत, असे अनेक इच्छुकांच्या गोटातून सांगितले गेले.
ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विवाह, साखरपुडा अशा कौटुंबिक समारंभांबरोबरच अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त पाहिला जातो. दक्षिणेतील राज्यांत तर अधिकारीही पदग्रहण करताना ‘राहूकाळ’ पाहतात म्हणे! पितृपक्षात उमेदवारी अर्ज भरण्याचे साहस सहसा कुणीच करत नाही. यावर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तसे आव्हान देऊनही कुणी अर्ज दाखल केला नाही. तथापि, वरिष्ठ पातळीवरून आघाड्या-बिघाड्यांचा लंबक सतत हलत राहिल्यानेही पितृपक्षात अर्ज दाखल करणे कुणाला शक्य झाले नाही. त्यामुळे उरल्यासुरल्या अवधीत मुहूर्त पाळणे कुणाकुणाला जमणार आणि कोण-कोण मुहूर्त न पाहता अर्ज दाखल करणार, हेही पाहावे लागणार आहे.
भारताचे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचले असतानाच अर्ज भरण्यासाठी मुहूर्त शोधणारे नेते फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगतात. या चौघांनीही शुभ-अशुभाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार केला. उमेदवारही त्यांचे विचार आणि कामाच्या जोरावरच विजयी होणार आहेत. त्यामुळे त्यांनी शुभ-अशुभांच्या चौकटी भेदाव्यात, अशी त्यांना आमची कळकळीची विनंती आहे.
- डॉ. हमीद दाभोलकर,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती