लग्नसराईच्या शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:18 AM2021-01-24T04:18:42+5:302021-01-24T04:18:42+5:30

वाई-महाबळेश्वर-खंडाळा तालुक्यांत औद्योगिकीकरण, पर्यटन, शेती उद्योग, कारखानदारी यामुळे झपाट्याने विकास होऊन बाजारपेठ मोठी होत आहे. तसेच हा परिसर शेतीसंपन्न ...

Markets ready for shopping at the auspicious moment of the wedding | लग्नसराईच्या शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

लग्नसराईच्या शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

googlenewsNext

वाई-महाबळेश्वर-खंडाळा तालुक्यांत औद्योगिकीकरण, पर्यटन, शेती उद्योग, कारखानदारी यामुळे झपाट्याने विकास होऊन बाजारपेठ मोठी होत आहे. तसेच हा परिसर शेतीसंपन्न पट्टा म्हणूनही ओळखला जातो. तालुक्यातील बाजारपेठांमधील व्यावसायिक व ग्रामीण व शहरातील ग्राहक यांचे पिढ्यानपिढ्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहे. यामुळे व्यावसायिकही ग्राहकांविषयी नेहमी सहकार्याची भूमिका ठेवून त्यांना सहकार्य करीत असतात. यामुळे सणारंभात मोठ्या उत्साहात स्थानिक बाजारपेठेत ग्राहक खरेदी करीत असतात.

वाई तालुक्याचा पूर्व भाग बागायतीचा असून, पश्चिम भागात सातारा जिल्ह्यातील सांगली जिल्ह्याची भाग्यरेषा ठरलेले धोम धरण आहे. कृष्णा नदी तीरावर वसलेल्या वाई नगरीला सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे राज्यात प्रसिद्ध असे महागणपती मंदिर आहे. कृष्णा नदीवर सात घाट व त्यावर असलेली शेकडो मंदिरे ही भाविकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. याबरोबर मांढरदेवी काळुबाई, तीर्थक्षेत्र धोम, मेणवली घाट व नाना फडणवीसांचा वाडा, रायरेश्वर, कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड, धोम-बलकवडी धरण हे पर्यटकांना आकर्षित करत असल्याने दरवर्षी लाखो पर्यटकांसह भाविक या परिसराला भेट देत असतात.

तसेच वाई तालुका निसर्ग संपन्न असल्यामुळे अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या परिसरात होत असते. वाईच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यामध्ये हजारो कामगारांमुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. सणारंभात ग्राहक मोठ्या उत्साहात खरेदी करीत असतात. नववर्ष व लग्नाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. सहाजिकच याचा फायदा शहरातील विविध प्रकारच्या व्यावसायिकांना होत असतो. तसेच वाई, पाचवड, भुईंज बाजारपेठेत शहरासह तालुक्यातील शेकडो गावातील नागरिक खरेदीसाठी येत असतात.

महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी व महाबळेश्वर ही जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. येथे देशासह जगभरातून लाखाे पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. ग्रामीण भागात स्ट्राॅबेरीसह विविध प्रकारची पिके घेतली जातात. पाचगणीला विद्यानगरी म्हणूनही संबोधले जाते. येथे देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. साहजिकच बाजारपेठेत पाचगणी, महाबळेश्वर शहर व ग्रामीण भागासह पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते. ग्रामीण भागातील नागरिक आठवडा बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने येत असतात.

वाई, खंडाळा तालुक्यांतून राष्ट्रीय महामार्ग गेला आहेत तसेच खंडाळा, शिरवळ, लोणंद परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिीकरण झाल्याने व खंडाळ्याला तालुक्याची भाग्यरेषा ठरलेला धोम-बलकवडीचा कालवा गेल्याने तालुक्याचा दुष्काळाचा शिक्का पुसून पाण्याचा प्रश्न बऱ्याअंशी मिटला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या-मोठ्या कंपन्या आल्यामुळे तालुक्यासह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन परिसरातील व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. खंडाळा, शिरवळ, लोणंद बाजारपेठांचा विकास झपाट्याने होताना दिसत आहे. याठिकाणी शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही लक्षणीय आहे.

एकंदरीत स्थानिक ग्राहकांच्या आवडी-निवडी, त्यांच्या समस्यांची खरी जाण स्थानिक व्यावसायिकांना खऱ्या अर्थाने असल्याने ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता नसते, विक्री पश्चात तत्पर सेवा ग्राहकांना मिळते. ग्राहकांना हवी असणारी वस्तू प्रत्यक्ष पाहावयास मिळत असल्याने चुकीची वस्तू ग्राहकांच्या माथी मारली जात नाही. यामुळे व्यावसायिक व ग्राहक यांच्यामधील विश्वासाचे नाते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

-पांडुरंग भिलारे, वाई प्रतिनिधी

Web Title: Markets ready for shopping at the auspicious moment of the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.