रस्त्यावर भरतो बाजार अन् वाहनधारक बेजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:30+5:302021-02-13T04:37:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : रहिमतपूरचा आठवडा बाजार प्रत्येक गुरुवारी भरतो. या दिवशी गांधी चौक ते रोकडेश्वर मंदिर या ...

The market fills up on the streets. | रस्त्यावर भरतो बाजार अन् वाहनधारक बेजार !

रस्त्यावर भरतो बाजार अन् वाहनधारक बेजार !

लोकमत न्यूज नेटवर्क

रहिमतपूर : रहिमतपूरचा आठवडा बाजार प्रत्येक गुरुवारी भरतो. या दिवशी गांधी चौक ते रोकडेश्वर मंदिर या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो. परिसरासह इतर तालुक्यातून आलेल्या विक्रेत्यांची वाहने रस्त्याकडेला अस्ताव्यस्त लावल्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

ऐतिहासिक काळापासून रहिमतपूरची ओळख बाजारपेठेचे गाव म्हणून केली जात आहे. गांधी चौक ते रोकडेश्वर मंदिर यादरम्यान आठवडा बाजार भरतो. बाजारासाठी परिसरातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांसह इतर तालुक्यांतील अनेक व्यापारी फळे व भाजीपाला विक्रीसाठी या बाजारात येतात. बाजारासाठी विक्रेत्यांसह खरेदीसाठी आलेल्या लोकांची संख्या सुमारे दोन हजाराच्या आसपास असते. बाजाराला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे बाजार ठिकाणांवरील रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे दिवसभर बंद ठेवली जाते. या व्यतिरिक्त गांधी चौक ते कमंडलू नदीवरील पुलापर्यंतविक्रेत्यांची रस्त्याच्या एका बाजूला गर्दी असते. यामध्ये फळे, भाजीपाला, कापड, धान्य, कडधान्य विक्रेत्यांचाही समावेश आहे.

रस्त्यावरील बाजारामुळे वाहतूक व्यवस्था बंद ठेवली जात असल्यामुळे स्थानिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. बाजाराला आलेले नागरिक आपली दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्याकडेला तसेच रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी आडवी-तिडवी लावून बाजारासाठी जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

(चौकट)

गांधी चौकात दररोज बसणाऱ्या फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी रहिमतपूर नगर परिषदेमार्फत जंगम मठाशेजारील ओघळीवर २२ गाळ्यांची मंडई उभारली आहे. यासाठी सुमारे २८ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, नुकतेच या मंडईचे उद्घाटन करण्यात आले आहे. लवकरच या गाळ्यांचा ताबा नियमित बसणाऱ्या फळ व भाजीविक्रेत्यांना भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे.

(कोट)

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवडा बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तेव्हाच वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. परंतु पर्यायी जागेत आठवडी बाजार भरविण्यासाठी सुमारे पाच एकर जागेची आवश्यकता असेल. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत.

- आनंदा कोरे, नगराध्यक्ष

फोटो : १२ रहिमतपूर

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील गांधी चौक ते रोकडेश्वर मंदिर या मार्गावर भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी अशी गर्दी होते.

लोगो : रस्त्यावरचा आठवडा बाजार : भाग ९

Web Title: The market fills up on the streets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.