विवाहितेचा जाचहाट; सहाजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:09+5:302021-05-23T04:39:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लग्नात फ्रीज दिला नाही तसेच घरातील कामे नीट करत नाही म्हणून एका विवाहितेचा ...

विवाहितेचा जाचहाट; सहाजणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लग्नात फ्रीज दिला नाही तसेच घरातील कामे नीट करत नाही म्हणून एका विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाबासाहेब औताडे, पद्मिनी औताडे, संदीप औताडे, स्नेहल औताडे, सुदर्शन औताडे, संजीवन औताडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, पीडित विवाहितेस जातिवाचक बोलून तिचा अपमान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्यामुळे या सहाजणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वर्षा दिलीप ओव्हाळ (वय ३२, रा. सुमनराज स्वरांजली रेसिडेन्सी गजराज कॉलनी, गोडोली, सातारा. सध्या रा. शिवाजी कॉलेज स्टाफ क्वार्टर्स, सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोडोली येथील घरी असताना बाबासाहेब हणमंतराव औताडे (रा. सुमनराज स्वरांजली रेसिडेन्सी गजराज कॉलनी, गोडोली, सातारा), पद्मिनी हणमंत औताडे, संदीप हणमंतराव औताडे, स्नेहल संदीप औताडे, सुदर्शन हणमंतराव औताडे, संजीवनी सुदर्शन औताडे (रा. मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) या सहाजणांनी किरकोळ कारणावरून शारीरिक तसेच मानसिक त्रास देऊन मारहाण केली. तसेच लग्नात फ्रीज दिला नाही या कारणावरून आणि घरातील कामे व्यवस्थित करत नसल्याच्या कारणावरून त्रास दिला. या सहाजणांकडून ''आम्ही घरंदाज आहोत. तुझी झोपडीतसुद्धा राहायची लायकी नाही,'' असे बोलून वेळोवेळी जातिवाचक बोलून अपमान केला. यावेळी बाबासाहेब औताडे याने वर्षा यांना मारहाण केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी वर्षा ओव्हाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सहाजणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल या करत आहेत.