मार्डीकर दुष्काळाला नक्कीच पराभूत करतील
By Admin | Updated: June 11, 2016 00:31 IST2016-06-10T23:26:24+5:302016-06-11T00:31:53+5:30
अश्विन मुदगल : गावच्या जलसंधारणाचा आदर्श अन्य गावांनी घेण्याचे आवाहन

मार्डीकर दुष्काळाला नक्कीच पराभूत करतील
पळशी : मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्डीकर दुष्काळाला पराभूत करतील, याची मला खात्री आहे. मार्डीकरांनी केलेल्या जलसंधारण कामाचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
माण तालुक्यातील मार्डी येथे लोकसहभाग व प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांची पाहणी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले, तहसीलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर,सरपंच कौशल्या पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, आर्ट आॅफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ, अॅड. पांडुरंग पोळ, डॉ. दीपक पोळ-पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल यांनी ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘दोन महिन्यात तब्बल पासष्ट किलोमीटर लांबीची खोल सलग समतल चर काढली, एवढं मोठं काम महाराष्ट्रात कुठेही झालं नसेल. खोल सलग समतल चरांमुळे झालेला
स्वच्छ पाणीसाठा हे या कामाचे यश आहे. सुरु असलेल्या कामात सातत्य टिकविण्याची आवश्यकता आहे. तरुणांनी जबाबदारी स्वीकारुन नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु झालेली एकजुटीची मोट अधिक घट्ट व्हावी.‘ यानंतर शिंदी खुर्द, भांडवली, तेलदरा, मलवडी व शिरवली या गावांना भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी काही मुलांनी आपल्या खाऊचे पैसे जलयुक्तसाठी दिले तर अनेक ग्रामस्थांनी स्वयंस्फूतीने हजारोंच्या देणग्या दिल्या. जलसंधारण कामांच्या पाहणीवेळी सर्व मान्यवरांनी खोल सलग समतल चरांमुळे झालेले चांगले परिणाम पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या चरांच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.(वार्ताहर)
दहा वर्षांनी दिसला पाण्याचा ओघळ
पाटीलवस्ती येथे खोल समतल चरीची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता चरीमध्ये मुरत आहे. त्यामुळे तब्बल दहा वर्षांनी मार्डीकरांना स्वच्छ पाण्याचे ओघळ वाहताना दिसले.
बियांचे संकलन
खणलेल्या चरींमध्ये पावसाचे पाणी मुरत असल्यामुळे ओलावा निर्माण झाला आहे. झाडे लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात बियांचे संकलन केले आहे. चरीच्या बाजूने सध्या रोपांची लागवड करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा बैलगाडीतून फेरफटका
मार्डी येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केली. यावेळी त्यांनी बैलगाडीत बसून शिवारातून फेरफटका मारला व ग्रामस्थांशी संवाद साधला.