मराठी विश्वकोश कार्यालय वाईतच : करंबेळकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 02:50 PM2019-12-16T14:50:27+5:302019-12-16T14:50:31+5:30

वाई येथील मराठी विश्वकोशाचे कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्याच्या चर्चा वाई शहरात चालू असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

Marathi vishwakosh office in wai: Karambelkar | मराठी विश्वकोश कार्यालय वाईतच : करंबेळकर 

मराठी विश्वकोश कार्यालय वाईतच : करंबेळकर 

googlenewsNext

वाई : ‘वाई येथील मराठी विश्वकोशाचे कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्याच्या चर्चा वाई शहरात चालू असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. शासन दरबारी याबाबतचा कोणताही निर्णय झाला नसून मराठी विश्वकोश कार्यालय वाईमध्येच राहणार आहे, तरी वाईकर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,’ अशी माहिती मराठी विश्वकोश कार्यालयाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी दिली.
 
मराठी विश्वकोशाचे कार्यालय वाईमधून हलविण्याची चर्चा मराठी भाषा विभागाच्या अधिका-यांमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने वाईकरांनी चिंता व्यक्त केली होती. या निर्णयाचे वाईत तीव्र पडसाद उमटले असून, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान, वाईतील कार्यालय कुठेही हलविण्याचा प्रस्ताव नसल्याचे विश्वकोशाच्या सहायक सचिवांनी सांगितले. मराठी भाषा प्रगल्भतेसाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून वाई येथे विश्वकोश खंडाचे काम १९६०मध्ये सुरू झाले. जागतिक विश्वकोशाच्या धर्तीवर मराठी भाषेत माहितीचा खजिना विश्वकोशाच्या माध्यमातून उभारण्याचा संकल्प आजही सुरू आहे. पूर्वी मुद्रित खंडाच्या माध्यमातून उपलब्ध असणारा विश्वकोश आता एका क्लिकवर गुगल व विश्वकोशाच्या अ‍ॅपवर उपलब्ध आहे.

विश्वकोशाचे काम गेली अनेक वर्षे वाईतून सुरू आहे. प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या प्रशस्त इमारतीत हे काम सुरू आहे. विश्वकोश कामकाज पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, विश्वकोशाच्या अद्ययावत ग्रंथालयाचा अनुभव घेण्यासाठी तसेच विश्वकोशाच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी अनेक अभ्यागत व विद्वान वाईला येत असतात. सध्याचे असणारे येथील कार्यालय पुणे अथवा मुंबई येथे हलविण्याचा मराठी भाषा विभागात सचिवस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याची चर्चा सुरुवातीला समाज माध्यमातून सुरू झाली. यावर वाई येथील भगवा कट्टा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे वाईकरांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. या अनुषंगाने वाईत तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. यानिर्णयाबाबत आंदोलन करण्यासाठी नागरिक, युवकांनी त्यांच्या स्तरावर आंदोलन उभारण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. तसेच वाईकर नागरिकांच्यावतीने तशा आशयाचे लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे.

Web Title: Marathi vishwakosh office in wai: Karambelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.