सातारा जिल्ह्यातही ‘माळीण’सारखी अनेक गावे

By Admin | Updated: July 30, 2014 22:50 IST2014-07-30T22:49:46+5:302014-07-30T22:50:02+5:30

सातारा : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळून मोठी दुर्घटना घडली.

Many villages like 'Malin' in Satara district too | सातारा जिल्ह्यातही ‘माळीण’सारखी अनेक गावे

सातारा जिल्ह्यातही ‘माळीण’सारखी अनेक गावे

सातारा : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळून मोठी दुर्घटना घडली. माळीण गावासारखीच डोंगर कड्यांखाली वसलेली अनेक गावे सातारा जिल्ह्यात आजही जीव मुठीत धरून जगत आहेत.
जिल्ह्यातील सातारा, महाबळेश्वर, पाटण, जावळी तालुक्यांत अनेक गावे धोकादायक कड्याच्या आडोशाला वसलेली आहेत. जवळपास निम्मा पाटण तालुका डोंगरकड्यांलगत राहत आहे. मेंढोशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या सडावाघापूर लगतच्या पठाराखाली ६१ कुटुंबांची बोर्गेवाडी धोकादायक कड्याखाली वसली आहे. डोक्यावर कड्याची टांगती तलवार घेऊन येथील ग्रामस्थ राहत आहेत. परळी खोऱ्यातील कोळोशी गावातील सुमारे पंचवीस कुटुंबे तीनशे फूट उंच कड्याखाली राहत आहेत. पावसाळा सुरू झाला की, येथील ग्रामस्थांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. भेदरलेल्या अवस्थेत लोक जगत आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील भेकवली गावात जमीन खचून घरांना भेगा पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील शिंदोळा, नावली, येटणे, एरंडल आढाळ, धारदेव, खालचे माचुतर, देवसरे, विवर, धावटी, चिखली या गावांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
जावळी तालुक्यातही पाचगणी डोंगराखाली अशी अनेक गावे धोकादायक अवस्थेत वास्तव्य करीत आहेत. पावसाळ्यात डोंगरकड्यांचे छोटे-मोठे दगड कोसळत असल्यामुळे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Many villages like 'Malin' in Satara district too