येरळाच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावले अनेकजण
By Admin | Updated: June 9, 2015 00:11 IST2015-06-08T21:42:50+5:302015-06-09T00:11:59+5:30
पुसेगाव : तज्ज्ञांची बैठक; मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार

येरळाच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावले अनेकजण
पुसेगाव : खटाव तालुक्यातील म्हस्कोबाच्या डोंगरात उगम पावलेल्या येरळा नदीचे पुनरुज्जीवन करून ती बारमाही प्रवाही राहावी, यासाठी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व राज्य शासन यांच्या समन्वयातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याबाबतचा मास्टर प्लॅन करण्यासंबंधी तज्ज्ञ लोकांची येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टमध्ये बैठक पार पडली. यावेळी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जलबिरादरीचे प्रभाकर बंदेकर, संघटक सुनील जोशी, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तहसीलदार विवेक साळुंखे, लघु सिंचनचे उपविभागीय अधिकारी एस. व्ही. मस्के, पुसेगावच्या सरपंच मंगल जाधव, बाळासाहेब इंगळे, प्रकाश जाधव, जोतिराम शिंदे, हणमंत शिंदे, मोळचे श्रीकांत घोरपडे, रामराव पवार, हणमंतराव गायकवाड, प्रल्हाद सावंत, लघु सिंचनचे शाखा अभियंता डी. आर. पाटील, नवनाथ साळुंखे उपस्थित होते.
येरळा नदी कायमस्वरूपी प्रवाही राहावी, यासाठी नदीच्या उगम स्थानापासून सिमेंट बंधारे, खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
सुनील जोशी म्हणाले, ‘डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात राज्य शासनाची मदत न घेता केवळ लोकसहभागातून सात नद्यांवर ११ हजार बंधारे बांधून त्या बारमाही प्रवाही केल्या. येरळा नदीच्या उगमापासून ३० किलोमीटर अंतरापर्यंतचा पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.’
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘खटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याठिकाणी शाश्वत पाण्याची सोय नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच येथील शेती व्यवसाय सुरू असतो. येरळा नदीचे पुनरुज्जीवन करून बारमाही प्रवाही करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, शासन व प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार येरळा नदीचे खोलीकरण, रुंदीकरणासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्वतोपरी सहकार्य करेल.’ (वार्ताहर)
येरळेसाठी अनेकांचे
सहकार्य लाभणार...
४या कार्यक्रमात पुसेगाव व परिसरात पडणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत कसे मुरविले पाहिजे. येरळा नदीचे खोलीकरण तसेच रुंदीकरण, बंधाऱ्यात अडविलेले पाणी कसे मुरविले जाईल, याविषयी अनेकांनी आपापली मते मांडून चर्चेत सहभाग नोंदविला. येरळा नदी बारमाही वाहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.