कित्येक खुर्च्या रिकाम्याच!
By Admin | Updated: January 2, 2015 00:12 IST2015-01-01T21:51:17+5:302015-01-02T00:12:45+5:30
कोयना व्यवस्थापन : उपकार्यकारी अभियंत्यासह १२ पदे रिक्त

कित्येक खुर्च्या रिकाम्याच!
पाटण : ज्याच्या जीवावर अख्खा महाराष्ट्र प्रकाशमान झाला आहे. त्या कोयना धरणाचा कारभार पाहण्यासाठी मंत्रालयातून अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती होत नसल्याची ओरड सध्या सुरू असून, कोयना धरण व्यवस्थापनात उपकार्यकारी अभियंत्यासह इतर १२ शाखा अभियंत्यांची पदे रिक्त आहे. त्यामुळे सध्या ड्यूटीवर असलेल्या आठ अभियंत्यांवर अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची वेळ आली आहे.
तब्बल १९६० मेगावॅट वीजनिर्मिती आणि १०५ टीएमसी पाणीसाठा, असे ऐश्वर्य असलेल्या कोयना धरणाकडे जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येत आहे. या व्यतिरिक्त कोयना धरण व्यवस्थापनात रस्ते, इमारती, भूकंप व पाऊस मोजण्याची उपकरणे पुनर्वसनाचे प्रश्न आदी जबाबदारी सांभाळावी लागते. त्यासाठी दहा शाखा अभियंते व कर्मचाऱ्यांची नेमणूक आवश्यक आहे. मात्र, कित्येक दिवसांपासून धरण व्यवस्थापनातील अभियंत्याची नेमणूक झालेली नाही. या नेमणुका मंत्रालयातून होतात. कोयना धरण व्यवस्थापनाचा कोयना येथील कारभार कार्यकारी अभियंता एम. आय. भरणे हे पाहत आहेत. त्यांचीदेखील बदली औरंगाबाद येथे झाली आहे. मात्र, त्यांच्या जागी बदली अधिकारी येईनात. तर त्यानंतरचे उपकार्यकारी अभियंत्याचे पद देखील रिक्त आहे. त्यांचा कार्यभार कोयना व्यवस्थापनातील रस्ते व इमारत विभागाच्या खेतवाडकर यांच्यावर आहे. (प्रतिनिधी)
५३ उपविभाग
कोयना बांधकाम विभागात ५३ उपविभाग आहेत. त्यातदेखील कर्मचाऱ्यांची पदे रिकामी आहेत. मुख्य अभियंता दीपक मोडक यांचे कार्यालय पुणे येथे तर अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते यांचे कार्यालय सातारा येथे आहे.