सेंद्रिय खतातून फुलली आंब्याची बाग
By Admin | Updated: April 4, 2015 00:03 IST2015-04-03T22:15:28+5:302015-04-04T00:03:27+5:30
नावडी येथील प्रयोग : आरोग्यास उपयुक्त फळे मिळणार चाखायला

सेंद्रिय खतातून फुलली आंब्याची बाग
मल्हारपेठ : रासायनिक खताला फाटा देऊन नैसर्गिक व निव्वळ सेंद्रिय खत वापरून उपलब्ध पालापाचोळा व पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने वाढविलेल्या आंबा फळांची निर्मिती करून पूर्ण आरोग्यास उपयुक्त असणाऱ्या सेंद्रिय आंब्याची जोपासना करणारे शेतकरी नानासाहेब लोंढे यांनी इतर शेतकऱ्यासमोर आदर्श आंबा बागेचा नमुना ठेवला आहे.नावडी, ता. पाटण येथील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी नानासाहेब लोंढे यांनी १२ ते १३ वर्षांपूर्वी आपल्या स्वत:च्या शेतात फळबाग लावण्याचे नियोजन करून कोकण विद्यापीठातील फळबाग कृषी विभागातून हापूस, पायरी, सिंधू, महाराज, रत्ना, तोतापुरी, नीलम, सुवर्णा रेखा आदी प्रकार अशा आंब्याच्या विविध जातीस आंतर पीक म्हणून चिकू, सुपारी, शेवगा, नारळ तसेच मसाल्याची दालचिनी, तमानपत्री अशा विविध फळ झाडाबरोबर, मसाल्याची, औषधी, झाडांची, रोपांची लागण केली. मुरमाड माळरानावर, सुरुवातीला त्रास सहन करून तीन ते चार वर्षांपासून आंबा, काजू, चिकू, नारळांचे विनाऔषध फवारणी, विना रासायनिक खतांच्या डोसाशिवाय निव्वळ सेंद्रिय शेण खतांवर, सकस, पोष्टिक व वजनदार फळांचे उत्पादन मिळू लागले.
या तयार झालेल्या फळांना कोणत्याही औषधीप्रक्रिया न करता स्वच्छ बॉक्समधून पॅकिंगद्वारे मोठ्या शहरात मागणीप्रमाणे मार्केटिंग होऊ लागले. आरोग्यास अत्यंत लाभदायी असल्याने या सेंद्रिय आंब्यांना मोठी मागणी येऊ लागली आहे. (वार्ताहर)