आत्मकेंद्री जगात माणुसकीनं गायिला ‘स्वराली’चा पाळणा!
By Admin | Updated: December 4, 2014 00:45 IST2014-12-04T00:37:48+5:302014-12-04T00:45:03+5:30
पटकथा नव्हे सत्यकथा : दोन जिवांसाठी रक्ताच्या पिशव्या घेऊन धावणाऱ्याला भेटले ‘देवदूत’

आत्मकेंद्री जगात माणुसकीनं गायिला ‘स्वराली’चा पाळणा!
सातारा : सहा महिन्यांपूर्वी वडिलांचं निधन, एक महिन्यापूर्वी तीन वर्षांच्या मुलाचा अपघात अन् काल मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या दोन जिवांना वाचविण्यासाठी रक्त आणताना दुचाकीचा अपघात. त्यातून स्वत:ला सावरत गाडी तिथेच टाकून रक्ताच्या पिशव्या छातीला कवटाळून महामार्गावरून धावताना दोन भल्या माणसांनी दाखविलेल्या माणुसकीनं ‘तो’ गाडीतून रक्त घेऊन दवाखान्यात पोहोचला अन् बायकोसह गर्भातील बाळाचाही जीव वाचला.
खंडाळा येथील पानटपरीचालक सुहास खंडागळे यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. सुहास आणि श्रद्धा खंडागळे या दाम्पत्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. मंगळवारी पत्नी श्रद्धाला दुसऱ्या बाळंतपणासाठी खंडाळ््याच्या स्पंदन रुग्णालयात दाखल केलेले. परंतु अंगात रक्त नसल्यामुळे गर्भातील बाळालाही व्यवस्थित रक्तपुरवठा होत नव्हता. प्रसंग बाका होता. डॉक्टरांनी सुहास यांना तातडीने दोन पिशव्या रक्ताची गरज असल्याचे सांगितले अन् धावाधाव सुरू झाली. खंडागळे यांनी खंडाळा, शिरवळ येथील केंद्रात पाहिले; मात्र शिरवळ येथे ‘ए पॉझिटिव्ह’ रक्तगटाची फक्त एकच पिशवी शिल्लक होती. वेळ रात्रीची. सैरभैर झालेल्या खंडागळे यांनी दुचाकीवरून सातारा गाठले. अक्षय ब्लड बँकेतून दोन पिशव्या रक्त घेऊन दुचाकीवरून खंडाळ्याच्या दिशेने निघाले. त्यांच्या डोळ्यासमोर दवाखान्यात तडफडणाऱ्या पत्नीचा चेहरा तरळत होता. त्याच विचारांत ते निघाले असता आनेवाडी टोलनाक्यानजीक रस्त्या ओलांडणाऱ्या दुचाकीनं धडक दिली अन् खंडागळे रस्त्यावर कोसळले.
रक्ताच्या पिशव्याही रस्त्यावर विखुरल्या. धडक देणारा पसार झाला. खंडागळे यांनी पुन्हा दुचाकी चालविण्याचा प्रयत्न केला; पण खांद्याला दुखापत झाल्याने ते शक्य झाले नाही.
रक्त वेळेत मिळाले नाही तर पत्नी वाचणार नव्हती. दुचाकी तेथेच टाकून पत्नीला वाचविण्यासाठी ते रक्ताच्या पिशव्या घेऊन महामार्गावरून धावू लागले. त्याचवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वीय सहायक महेंद्र जाधव आणि उद्योजक चेतन गाडे हे आपल्या कारमधून भुर्इंजला येत होते. त्यांनी जखमी अवस्थेत रस्त्याने पळत असलेल्या खंडागळे यांना पाहताच गाडी थांबवून विचारपूस केली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी खंडागळे यांना आपल्या कारमध्ये घेऊन हॉस्पिटल गाठले.
हॉस्पिटलमध्ये नातेवाईक रक्ताची वाट पाहत होते. त्यांना सर्व प्रकार समजला तेव्हा एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता. (प्रतिनिधी)