सातारा : खवले मांजर या वन्यप्राण्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातून खवले मांजर हस्तगत करण्यात आले. ही कारवाई सुरूर, ता. वाई येथे शनिवारी (दि. २८) करण्यात आली.दीपक श्रीरंग मोहिते (वय ४४, रा. वहागांव ता. वाई) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सुरूर, ता. वाई परिसरात अतिदुर्मीळ असलेल्या खवले मांजर या वन्यप्राण्याची तस्करी करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एक पथक तयार केले. हे पथक सुरूरला रवाना झाले. सुरुर गावच्या हद्दीत एकजण संशयास्पदरीत्या पोलिसांना दिसल्यानंतर त्याची झडती घेतली. त्याच्याकडे पॉलीथीनचे पोते होते. त्यामध्ये पोलिसांनी पाहिले असता दुर्मीळ प्राणी खवले मांजर त्यात आढळून आले.पोलिसांनी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता खवले मांजर वहागाव, ता. वाई गावच्या हद्दीतील डोंगरामध्ये पकडले असून, एका व्यक्तीला ते मांजर विक्री करणार असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी वनपाल यांना बोलावून पंचनामा केला. त्यानंतर मोहिते याला पोलिसांनी अटक केली. भुईंज पोलिस ठाण्यात त्याच्यावर विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वन्यप्राणी खवले मांजराची सुखरूप सुटका झाल्यानंतर त्याला पुन्हा वन्य अधिवासात सोडण्यात आले.पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, हवालदार अतिष घाडगे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, सचिन ससाणे, प्रवीण पवार, दलजित जगदाळे यांनी या कारवाईत भाग घेतला.
Satara: खवले मांजराची तस्करी करणाऱ्या एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:46 IST