मामाचा गाव उरलाय गाण्यापुरताच!

By Admin | Updated: April 12, 2015 23:57 IST2015-04-12T22:06:14+5:302015-04-12T23:57:41+5:30

कामासाठी मामाही शहरात : चिमुरड्यांसाठी संस्कारांची खाण होतेय दुर्मिळ

Mama's village just for singing! | मामाचा गाव उरलाय गाण्यापुरताच!

मामाचा गाव उरलाय गाण्यापुरताच!

परळी : समृद्ध निसर्ग, आजीची माया, आजोबांचा प्रेमळ धाक, सुगरण मामीच्या हातचे खमंग जेवण, सुख, आनंद देणारा... कधी अनोख्या विश्वाची सफर घडविणारा... तर कधी आयुष्यभर शिदोरीसारखा पुरून उरणाऱ्या आठवणी जपणारा मामाचा गाव आता दूर राहिला असून तो त्याचे केवळ गाण्यातच अस्तित्व उरले आहे. काळाच्या ओघात मामाचा गाव लुप्त झाला आहे. त्यामुळे बालगोपाळांसाठी ही संस्कारांची खाण दिवसेंदिवस दुर्मिळ होऊ लागली आहे.
पूर्वी एप्रिल महिन्यात परीक्षा संपली की वेध लागायचे ते मामाच्या गावाचे. सुटीच्या अगदी पहिल्या दिवशीच मामाचा गाव गाठायचा. मनसोक्त बागडणं, रानोमाळ भटकणं, कैऱ्या, चिंचा, बोरं खाणं. भातुकलीच्या खेळात रमणं. दिवसभर उन्हात उनाड पाखरांसारखं फिरणं, बैलगाडीत बसून शिवारात फेरफटका मारणं आणि दिवेलागण व्हायच्या आत घराकडं वळणं हे मंतरलेले दिवस आता मुलांच्या वाटेला येत नाहीत. खेळून-बागडून घरी आल्यानंतर हात-पाय धुवून शुभंकरोती म्हणणं. रात्री मामीनं केलेल्या सुग्रास जेवणावर ताव मारल्यानंतर अंगणात चांदण्यात आजीकडून गोष्टी ऐकण्यात एक वेगळी मजा असायची. मात्र आता आटपाटनगराची कहाणी ऐकायला मिळत नाही. आजीची एक गोष्ट म्हणजे चार-चार दिवस चालायची. कारण चांदण्यांकडे बघत झोप कधी लागायची कळायचेही नाही.
मामाचा गाव म्हणजे विचारांची खाणच जणू. शब्दांचं भांडार असलेल्या मामाच्या गावाला गेलं की शब्दसंपत्ती वाढायची. तिथं आजी-आजोबाकडून म्हणी, उखाणे, श्लोक शिकविले जायचे. मामा-मामी पाढ्याचे पाठांतर घ्यायचे. मित्र-मैत्रिणी गोळा करून गाण्याच्या भेंड्या खेळल्या जायच्या. आठचंलस, सापशिडी, पत्ते असे कितीतरी खेळ खेळले जायचे. आजीनं भरवलेला प्रेमाचा खास आजच्या पिझ्झा, बर्गरपेक्षा कितीतरी गोड वाटायचा.
आता मुलांचं जग टीव्ही, संगणक, मोबाईलपुरतं मर्यादित झालं असून चार भिंतीत बंदिस्त झालं आहे. आई-वडिलांना आपल्या कामातून मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर नवरा-बायकोच्या संसारात अडचण नको म्हणून म्हातारे आजी-आजोबांना घरात जागा उरली नाही. (वार्ताहर)


संपर्क वाढला पण ओढ
कमी झाली
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं पण नाती दुरावत चालली आहे. मोबाईलमुळं संपर्क वाढला पण पूर्वीसारखी एकमेकांबद्दल वाटणारी ओढ कमी झाली आहे. तांत्रिक जगात मुलं आनंद शोधू पाहत आहेत. या बदलामुळे मामाचा गाव हरवलाय.


हरवलेल्या
गावाचा शोध
काळाच्या ओघात मामाचा गाव हरवला असला तरी निसर्ग, नाती तेव्हाही होती, आताही आहेत. मिळालेल्या सुटीत हरवलेला मामाचा गाव शोधल्यास तो नक्की सापडेल. फक्त विचार बदलण्याची गरज आहे. एक पाऊल सिमेंटच्या जंगलाबाहेर टाकण्याची गरज आहे.


अंगणात आता नाही
फुलत पारिजात
सिमेंटच्या घराला असलेल्या अंगणात आता पारिजात फुलत नाही. परिसरात बकुळीची फुले दिसत नाहीत. विहिरीजवळचा सोनचाफा, रातराणी आता कुठंच दिसत नाही.
मामाही कामासाठी शहरात
नोकरी-धंद्यासाठी लोक शहराकडे वळू लागलेत. त्यामुळं गावं ओस पडत चालली आहेत. गावाकडचा मामाही आता शहरात येऊन राहू लागलाय आपल्या कुटुंबासह. त्यामुळे शाळेला सुटी लागल्यानंतर मुलांना मामाच्या गावाला जाता येत नाही.

Web Title: Mama's village just for singing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.