मलकापूरला ‘ओडीएफ डबल प्लस’साठी मानांकन

By Admin | Updated: August 5, 2016 02:05 IST2016-08-05T00:40:28+5:302016-08-05T02:05:22+5:30

नगरपंचायतीचा पुढाकार : नावीन्यपूर्ण योजनांमध्ये एक पाऊल पुढे

Malkapur's ODF Double Plus Rating | मलकापूरला ‘ओडीएफ डबल प्लस’साठी मानांकन

मलकापूरला ‘ओडीएफ डबल प्लस’साठी मानांकन

मलकापूर : मलकापूरने शहरी विभागात विविध नावीन्यपूर्ण योजना यशस्वी राबवत दि. २ आॅक्टोबर रोजी हगणदारीमुक्त शहर म्हणून वेगळा ठसा उमटविला. याची दखल घेऊन स्वच्छतेत सातत्य राखण्यासाठी शासन स्तरावर ‘ओडीएफ डबल प्लस’साठी मानांकन मिळाले आहे. त्यामुळे नावीन्यपूर्ण योजना यशस्वी करण्यात नगरपंचायतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
येथील नगरपंचायतीने गेली आठ वर्षांत २४ तास पाणी, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, सोलरसीटी यासारखे अनेक नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबवत मलकापूरचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. ग्रामस्वच्छता अभियानातही मागेल त्याला स्वच्छत गृहासाठी अनुदान देऊन शंभर टक्के घरात स्वच्छतागृह उभी केली. उघड्यावर शौचास बसू नये, म्हणून शहरात विविध मार्गाने प्रबोधन केले.
यासाठी त्या-त्या प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्याचे फळ म्हणून शासनाच्या विविध पथकाने पाहणी करून दि. २ आॅक्टोंबर २०१५ रोजी मलकापूरला हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित केले. ग्रामस्वच्छता अभियानातील सातत्य राखण्यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर ‘ओडीएफ डबल प्लस’ या विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या सर्व कसोट्या पार करणाऱ्या शहराला विशेष निधी देऊन गौरव करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी काही निवडक शहरांची निवड शासनाने केली आहे. त्या निवडक शहरात मलकापूरचा समावेश झाला असून, ‘ओडीएफ डबल प्लस’ या योजनेसाठी मलकापूर नगरपंचायतीला मानांकन प्राप्त झाले आहे.
या योजनेच्या सर्व कसोट्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. तसा ठरावही विशेष सभेत करण्यात आला आहे. या शासनाच्या विशेष योजनेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने नावीन्यपूर्ण उपक्रमात मलकापूरने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. (वार्ताहर)


चार गुडमॉर्निंग पथके सज्ज
मलकापूर शहराचा चार प्रभागांत विस्तार झालेला आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी चार प्रभागांत चार गुडमॉर्निंग पथकांची स्थापना करण्याचा निर्णय झाला. या पथकांमध्ये त्या-त्या प्रभागांतील नगरसेवक, एक अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे. आठवड्यातून एकदा कारवाई होणार आहे.


शालेय विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण
स्वच्छतेत सातत्य आहे की नाही, यासाठी शहरातील २२ अंगणवाड्या, ११ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ६ विविध संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांतील हजारो मुलांमार्फत सर्वेक्षण फॉर्म भरून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीनशे दंड, दीडशे रुपये बक्षीस
शहरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यास नगरपंचायतीने ३०० रुपये दंड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. तर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची माहिती नगरपंचायतीला देणाऱ्या नागरिकाला १५० रुपये बक्षीस देण्याची घोषणाही सभेत करण्यात आली.

Web Title: Malkapur's ODF Double Plus Rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.