मलकापुरात चोरट्यांची धास्ती

By Admin | Updated: February 6, 2015 00:44 IST2015-02-05T23:47:35+5:302015-02-06T00:44:07+5:30

महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना : भररस्त्यात होतोय पाठलाग; पोलीस गस्त वाढविणे गरजेचे

Malkapur scandal scared | मलकापुरात चोरट्यांची धास्ती

मलकापुरात चोरट्यांची धास्ती

मलकापूर : शहर ज्या प्रमाणात विस्तारत आहे त्याचपटीत शहरामध्ये गुन्हेगारी कारवायाही वाढल्या आहेत. सध्या धूमस्टाईल चोरी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात असून, त्यामुळे महिलांत भीतीचे वातावरण आहे. पाठलाग होण्याच्या धास्तीमुळे रस्त्यावरून चालताना महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
मलकापूर येथे शिवछावा चौकात दोन दिवसांपूर्वी युवतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मोबाईल हिसकावण्याचा प्रकार घडला. संबंधित चोरट्याला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले असले तरी या घटनेमुळे रस्त्यावरून चालताना महिला असुरक्षित असल्याचे अधोरेखित झाले आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगाशिवनगर, कोयना वसाहत, शास्त्रीनगर यासह गावठाणात बंद फ्लॅट व घरे फोडून लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबरोबरच लहान-मोठ्या चोरीच्या घटनाही गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत.
काहींनी या चोऱ्यांंबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, ज्यांची किरकोळ रक्कम अथवा ऐवज चोरीस गेला, ते पोलिसांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच गेल्या दोन महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मोरया कॉम्प्लेक्स व इमर्सन कंपनीसमोर काही दिवसांपूर्वी वृद्धांना आपण पोलीस असल्याचे सांगून चोरट्यांनी फसविले होते. संबंधित महिलांकडील दागिने त्यांनी लंपास केले.
ही घटना ताजी असताना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भरचौकात युवतीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून महागडा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. त्या चोरट्याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेवरून चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, याची प्रचीती येते. महिला वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असल्यामुळे शहर पोलिसांनी या भागात गस्त वाढविणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

महिलांसह विद्यार्थिनींमध्ये भीती
कृष्णा अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध शैक्षणिक संकुलांत शिक्षणासाठी आलेल्या युवतींची संख्या जास्त आहे. त्यापैकी काही मुली कॅम्पसच्या आतच वास्तव्य करतात. काही विद्यार्थिनी इतर ठिकाणी भाडेतत्त्वावर फ्लॅट, खोली घेऊन वास्तव्यास आहेत. या विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील असते. चोरांच्या भीतीमुळे काही विद्यार्थिनी कॉलेज कॅम्पसमधून बाहेरच पडत नाहीत.

Web Title: Malkapur scandal scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.