मलकापूरची दफनभूमी समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:07+5:302021-02-05T09:14:07+5:30
यावेळी ख्रिस्ती युवा शक्तीचे राज्याध्यक्ष राकेश सावंत, कार्याध्यक्ष गणेश ननावरे, अतुल घाटगे, ख्रिस्ती धर्मगुरू पौल वायदंडे, संतोष वाडते, सुशील ...

मलकापूरची दफनभूमी समस्यांच्या विळख्यात
यावेळी ख्रिस्ती युवा शक्तीचे राज्याध्यक्ष राकेश सावंत, कार्याध्यक्ष गणेश ननावरे, अतुल घाटगे, ख्रिस्ती धर्मगुरू पौल वायदंडे, संतोष वाडते, सुशील चोपडे, अनिल महापुरे, दिनेश शिंदे, संतोष करडे, योहान मेंगे, सुरेश लोंढे, राजन भोरे उपस्थित होते.
मलकापूर पालिका हद्दीतील आगाशिवनगर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याठिकाणी झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले असून दफनभूमीच्या विविध समस्यांवर वेळोवेळी मागणी करूनही नगरपंचायतीसह लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत आहेत. दफनभूमी बाबतच्या समाजाच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ख्रिस्ती युवा शक्ती महाराष्ट्र, ब्लेसिंग युथ व समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
ख्रिस्ती युवा शक्तीचे अध्यक्ष राकेश सावंत म्हणाले, आगाशिवनगर येथे ख्रिस्ती समाजाला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे ८४ गुंठे जागा दफनभूमीसाठी मिळाली आहे. या दफनभूमीवर अतिक्रमण व इतर समस्यांबाबत समाजाच्यावतीने पालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. दफनभूमीस संरक्षक भिंत नसल्यामुळे याठिकाणी झोपड्यांची अतिक्रमणे करण्यात आली आहेत. दफनभूमीतील अनेक कबरींची तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच दफनभूमीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
अनेक वर्षांपासून ख्रिस्ती समाज दफनभूमीतील समस्यांसाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र सत्ताधारी टोलवा टोलवीची उत्तरे देत आहेत. आमदार असो अथवा नगराध्यक्ष तसेच अनेक लोकप्रतिनिधींना समस्यांबाबत भेटूनही या अडचणी अनेक वर्षांपासून रखडत ठेवल्या आहेत. दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असून समाजाच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न चालू असल्याचे गणेश ननावरे यांनी सांगितले.