खरेदी-विक्री संघात मकरंद पाटील यांचे पारडे जड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:23+5:302021-09-05T04:44:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये खरेदी-विक्री संघामधील विद्यमान संचालक मकरंद पाटील यांचे पारडे जड असल्याचे ...

खरेदी-विक्री संघात मकरंद पाटील यांचे पारडे जड
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये खरेदी-विक्री संघामधील विद्यमान संचालक मकरंद पाटील यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने आ. पाटील यांना ही निवडणूक सोपी झाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी खरेदी-विक्री मतदारसंघातून एक संचालक घेतला जातो. आमदार मकरंद पाटील हे याच मतदार संघातून जिल्हा बँकेवर संचालक आहेत. जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर वगळता इतर सर्व म्हणजे १० तालुक्यांमध्ये खरेदी-विक्री संघ आहेत. तसेच जिल्हा खरेदी-विक्री संघ स्वतंत्र आहे.
जिल्हा खरेदी-विक्री संघातून आमदार मकरंद पाटील यांचे मतदान आहे, तर जावलीतून सौरभ शिंदे, साताऱ्यातून राजू भोसले आणि फलटणमधून शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारे मतदार आहेत. कऱ्हाड खरेदी-विक्री संघातून काँग्रेसचे ॲड. उदयसिंह पाटील यांचे एक मत आहे, तर सत्यजित पाटणकर (पाटण), आमदार शशिकांत शिंदे (कोरेगाव), माजी आमदार प्रभाकर घार्गे (खटाव), मनोज पोळ (माण), मुगुटराव साळुंखे (खंडाळा), नितीन पाटील (वाई) हे सहा राष्ट्रवादीचे मतदार आहेत.
निवडणूक बिनविरोध करण्यावर भर...
खरेदी-विक्री मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. या मतदारसंघामध्ये ११ पैकी ७ मते राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत. जरी निवडणूक लागली, तरी राष्ट्रवादीचा उमेदवार सहज निवडून येणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राजे गट पाटलांच्या पाठीशी..!
खरेदी-विक्री मतदारसंघामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारे तीन मतदार आहेत. राजेंच्या आदेशानुसार हे मतदार मतदान करणार आहेत. तसेच काँग्रेसचे ॲड. उदयसिंह पाटील यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला यश आले, तर ही सर्व मते आ. मकरंद पाटील यांच्या पारड्यात पडणार आहेत.
(मकरंद पाटील यांचा आयकार्ड फोटो वापरावा)