मार्ग काढा, नाहीतर चौपाटी गांधी मैदानावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:29+5:302021-02-05T09:08:29+5:30
सातारा : गांधी मैदान चौपाटीवरील हातगाडीधारकांचे पालिकेने आळूचा खड्डा येथील मोकळ्या जागी पुनर्वसन केले; परंतु ही जागा व्यवसायासाठी अपुरी ...

मार्ग काढा, नाहीतर चौपाटी गांधी मैदानावरच
सातारा : गांधी मैदान चौपाटीवरील हातगाडीधारकांचे पालिकेने आळूचा खड्डा येथील मोकळ्या जागी पुनर्वसन केले; परंतु ही जागा व्यवसायासाठी अपुरी व अडचणीची ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने जागेचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अन्यथा दि. ३ फेब्रुवारी रोजी गांधी मैदानाच्या जागेतच चौपाटी पुन्हा सुरू करू, असा इशारा हॉकर्स संघटनेने दिला आहे.
हॉकर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. आळूच्या खड्ड्यातील चौपाटीची जागा अपुरी व हगणदारीतील असून, व्यवसायाच्या दृष्टीने अयोग्य आहे. राजवाडा चौपाटी हलविताना आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. तसेच ही जागा तात्पुरत्या स्वरूपाची आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी जागेचा निर्णय होत नाही तोपर्यंत राजवाड्यावर चौपाटी सुरू ठेवण्याचा सूर यावेळी हॉकर्स संघटनेने आळविला. मात्र मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी गांधी मैदान राजवाडा येथे चौपाटी सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही असे स्पष्टपणे बजावले.
आधीच लॉकडाऊन त्यात चौपाटी बंद यामुळे चौपाटी विक्रेत्यांची आर्थिक तंगी वाढली असून बँक कर्ज परताव्याची अडचण झाली आहे. विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दि. ३ फेब्रुवारी रोजी चौपाटी मूळ जागेवरच सुरू केली जाईल, असा इशारा हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी दिला. यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप माने, विश्वास जगताप अंकुश राजपुरे, नीलम निकम, पूनम खंडागळे, श्यामराव शिंदे, राजेंद्र्र साळुंखे आदी उपस्थित होते.