रेशनिंग दुकानदारांची चौकशी करावी
By Admin | Updated: May 1, 2015 00:18 IST2015-04-30T21:25:26+5:302015-05-01T00:18:05+5:30
शेतकरी संघटनेची मागणी : पुरवठा मंत्र्यांकडे केली तक्रार

रेशनिंग दुकानदारांची चौकशी करावी
कऱ्हाड : ‘स्वस्त धान्य दुकाने व रॉकेल परवानाधारकांची सखोल चौकशी होऊन गत पंधरा वर्षांचे आॅडिट व्हावे,’ अशी मागणी शेतकरी संघटनेने नागरी पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.कऱ्हाड तालुक्यातील शहर व सर्व ग्रामीण भागातील गावे व वाडी-वस्तीमध्ये असणारे रेशनिंग दुकानदार व रॉकेल परवानाधारक विक्रेते हे धान्य व रॉकेलचे शिधापत्रिकेप्रमाणे वाटप करीत नाहीत.
धान्य किराणा दुकानदार, अन्य बाजार व हॉटेलमध्ये विक्री केली जात आहे. दुकानदार बेकायदेशीर स्टॉक करून त्याची विक्री व अन्य विल्हेवाट लावत आहेत. शिधापत्रिकाधारकांना त्यांचे हक्काचे धान्य व रॉकेल मिळू शकत नाही. यातून कऱ्हाड तालुक्यातील दुकानदार महिन्याला लाखोंचा भ्रष्टाचार करत असून, त्यामध्ये पुरवठा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामील आहेत. ही बाब आम्ही पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकरी संघटनेने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, पुरवठा खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी, स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल परवानाधारक विक्रेते व त्यांच्या नातेवाइकांच्याही मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)