मुख्य रस्ता सामसूम... गल्लीबोळ जाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:13+5:302021-06-05T04:28:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा शहरात मुख्य रस्त्यांवर पोलिसांची फौज असल्याने शहरातील गल्लीबोळांमध्ये ट्रॅफिक ...

मुख्य रस्ता सामसूम... गल्लीबोळ जाम!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा शहरात मुख्य रस्त्यांवर पोलिसांची फौज असल्याने शहरातील गल्लीबोळांमध्ये ट्रॅफिक जाम होऊ लागलं आहे. पोलिसांना चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी या दिवसांत अनेकांनी शहरात फिरण्याचे खुष्कीचे मार्ग शोधले आहेत.
सातारा शहर आणि तालुक्यात कोविडचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. वाढणाऱ्या या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध आणल्यानंतर कोणत्याही कारणांनी कोणीही बाहेर पडण्याचा विषयच संपुष्टात आला. परिणामी सलग चार दिवस घरात बसल्यानंतर प्रत्येकालाच बाहेर फिरावंसं वाटू लागलं. मुख्य रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा आणि त्यांच्या चौकशींचा ससेमिरा नको म्हणून अनेकांनी घराबाहेर जाणं टाळलं.
अत्यावश्यक सेवा बंद असली तरीही परस्परांना भेटायला आणि खेळाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. मुख्य रस्त्यावर पोलिसांचा खडा पहारा असल्याने त्यांची नजर चुकवून गल्लीबोळातून फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पूर्वी माहीत नसलेले रस्ते कोविडकाळाने दाखवून दिले. काही ठिकाणी वाहतूक अडविण्यासाठी बांबू बांधण्यात आले आहेत. काही ठिकाणी बॅरिकेडच्या साहाय्याने रस्ता अडविला गेला आहे. मुख्य रस्त्यावर जाऊन पोलिसांचा सामना करण्यापेक्षा गल्लीबोळातील रस्ते सातारकरांना अधिक सुरक्षित वाटू लागले आहेत.
चौकट :
दुपार अन् रात्र बाहेर पडायला सुरक्षित!
कडक लॉकडाऊन असलं तरीही सकाळी ९ च्या आधी, दुपारी १ ते ४ आणि रात्री ८ नंतर पोलीस बंदोबस्त तुलनेने शिथिल होतो. नेमकं याच वेळेत बाहेर पडणाऱ्यांची संख्या आता वाढताना दिसत आहे. दिवसभर घरात बसून वैतागलेली तरुणाई पोलिसांचा अंदाज घेऊन परस्परांच्या भेटीसाठी बाहेर पडत आहे. अशा फिरस्त्यांना गस्तीची गाडी धूम ठोकून पळायला भाग पाडत आहे.
कोट
लॉकडाऊन कडक केल्यामुळे अत्यावश्यक सेवाही उपलब्ध होत नाहीत. माझे पालक गोडोलीत राहतात. दुधासह अन्य आवश्यक गोष्टी द्यायला त्यांच्याकडे जावं लागतं. पहिल्या दिवशी राजवाड्यावरून गेले तर विनाकारण फिरताय म्हणून पोलिसांनी दंड केला. त्यानंतर मी चार भिंतीमार्गे त्यांच्यापर्यंत जाऊ लागले.
- प्रणिता जगताप, मंगळवार पेठ, सातारा